विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विजेचे वाढीव दर तसेच लघुउद्योगांना पायाभूत सुविधांसाठी करावा लागणारा प्रचंड खर्च, एमआयडीसी व ग्रामपंचायत यांचा अन्यायकारक दुहेरी कर,लघुउद्योगांना शासनाकडून मंजूर अनुदान मिळण्यासाठी होणारा विलंब, राज्यातील अनेक औद्योगिक
वसाहतींमध्ये माथाडी कायद्यासंबंधीत येणाऱ्या अडचणी अशा राज्यातील सर्व उद्योगांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील प्रमुख औद्योगिक संघटनांबरोबर समन्वय ठेवून राज्यस्तरावर एकत्रित प्रयत्न करण्याची ग्वाही बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, उपाध्यक्ष शरद सूर्यवंशी, सदस्य महादेव गायकवाड, मनोहर गावडे यांनी औरंगाबाद येथे आयोजित राज्यस्तरीय उद्योग संघटनांच्या बैठकीत दिली.
मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर यांच्या पुढाकारातून चिकलठाणा औरंगाबाद येथे राज्यातील प्रमुख औद्योगिक संघटनांची एक विशेष बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती.
यावेळी म.सी.आ चे अध्यक्ष किरण जगताप, उपाध्यक्ष भगवान राऊत,सदस्य अनिल पाटील,राजेंद्र चौधरी, सुरेश खिलारे, प्रल्हाद गायकवाड, दुष्यंत आठवले, मनीष अग्रवाल, अर्जुन गायकवाड, सचिन गायके, कमलाकर पाटील, सर्जेराव सोळंके, शरद चोपडे, सलील पेंडसे, रोहन येवले,श्रीकांत सूर्यवंशी, रोष होंडेकर, विरेन पाटील, हरिश्चंद्र पठाडे, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे प्रशांत मोरे ,चाकण चेंबर ऑफ कॉमर्स चे किरण दिंडे, सी एम.आय.ए चे दुष्यंत पाटील, रवींद्र मानवतकर,उत्सव माछर,ऊर्जा मंचचे हेमंत कपाडिया, बुद्धिस्ट इंडस्ट्रियल असोसिएशनचे मिलिंद थोरात आदींनी या बैठकीत सहभाग घेतला.
लघुउद्योगांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते तसेच उद्योगमंत्र्यांना प्रमुख औद्योगिक संघटनांनी एकत्रित भेटून पाठपुरावा करण्यात येईल. असे निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आले. बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ही बारामतीच्या औद्योगिक प्रगतीसाठी कटिबद्ध असून उद्योगांच्या अडचणी सोडवणे बरोबरच उद्योजकांचा व्यवसाय वाढवण्यासाठी राज्यातील प्रमुख औद्योगिक क्षेत्रांना भेटी देऊन उद्योजकांमध्ये सुसंवाद निर्माण करणार असून म.सी.आ.सह इतर प्रमुख औद्योगिक संघटनांनी सहकार्य करावे असे आवाहन बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी यावेळी केले.