राजेंद्र झेंडे : महान्युज लाईव्ह.
दौंड : तालुक्यातील पाटस येथील पालावर राहणाऱ्या समाजानेही आपल्या तात्पुरत्या उभारलेल्या पालावर अभिमानाने राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला!
त्यांनी दाखवून दिलं की, आम्ही गरीब असलो, वंचित असलो, भलेही आम्हाला पक्के घर नसेल, तरीही आम्हाला या देशाचा, देशाचा राष्ट्रध्वजाचा सार्थ अभिमान आहे आणि म्हणूनच आम्ही स्वाभिमानाने राष्ट्रध्वज लावला. भटक्या कुटुंबांनी आपल्या पालाच्या झोपडीला राष्ट्रध्वज फडकून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या अमृत महोत्सव या उपक्रमात सहभाग दर्शवला!
पुणे जिल्हा परिषदेच्या एकात्मिक महिला बाल विकास विभागाच्या वतीने व दौंड पंचायत समितीच्या एकात्मिक महिला बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी अक्षदा शिंदे यांनी तीन दिवसांपूर्वी पाटस परिसरातील पालावर भटकंती करणाऱ्या समाज, ऊसतोड कामगार, वीट भट्टी कामगार तसेच गोरगरीब कुटुंबांना त्यांच्या पालावर जाऊन तिरंगा ध्वजाचे मोफत वाटप केले. हा ध्वज १३ ते १५ ऑगस्ट पर्यंत आपल्या घरावर फडकविण्याचे आवाहन त्यांनी ह्या कुटुंबांना केले होते. त्यांच्या ह्या आवाहनाला व विनंतीला प्रतिसाद ह्या कुटुंबांना देत झेंडा फडकावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजीच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त ” हर घर तिरंगा “ही मोहीम राबवण्याचे आवाहन केले होते. त्या मोहिमेत आपल्या छोट्याशा पालाच्या झोपडीला राष्ट्रध्वज लावून ही कुटुंबे सहभागी झाली आहेत. एवढेच नाही, तर दौंड तालुक्यातील गावागावात भटकंती करणाऱ्या, आपल्या बकरी, मेंढरासह भटकंत करीत फिरणाऱ्या धनगर समाजाने त्यांच्या पालावर, ऊस तोडणी मजूर कामगार, वीट भट्टी मजूर कामगार तसेच झोपडपट्टी वसाहतीमध्ये गोरगरीब वंचित घटकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज तिरंगा अभिमानाने फडकवला.