मुंबई महान्यूज लाईव्ह
मुंबईतील अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला दबावाखाली घेण्यासाठी भाजपने नवी चाल खेळली आहे. अर्थात आता बंदूक किरीट सोमय्या नव्हे तर शिवसेनेने लक्ष्य केलेल्या मोहित कंबोज याच्यावर आहे. कंबोज यांनी राष्ट्रवादीतील बड्या-बड्या नेत्याचा सिंचन घोटाळा, गर्लफ्रेंडच्या नावावरील संपत्ती, परदेशातील संपत्ती यांचा भंडाफोड करणार असल्याचा इशारा दिला आहे.
गेल्या काही वर्षात भाजपचे सरकार सत्तेवर आहे. मात्र येथे सरकारी अधिकाऱ्यांकडून नव्हे तर दोन-चार दिवस अगोदर भाजपचे नेते ट्विट करून आम्ही अमुक भ्रष्टाचार बाहेर काढू, तमुक नेता तुरुंगात जाणार असे ट्विट करतात. त्यामागे समाजातून काय प्रतिक्रिया व्यक्त होते, याचा अंदाज घेतला जातो. त्यानंतर मग त्यांची पुढील वाटचाल सुरू होते.
आताही सन २०१९ मध्ये सिंचन घोटाळ्याची परमबीरसिंग यांनी बंद केलेली घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडण्याची मागणी करणार असल्याचे भाजपचा मुंबईतील नेता मोहित कंबोज यांनी ट्विट करून काल स्पष्ट केले. त्यानंतर राजकीय वर्तुळातील भुवया उंचावल्या आहेत.
कंबोज यांनी एकाच दिवसात तीन ट्विट करून राष्ट्रवादीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पुन्हा एकदा आक्रमक झालेली असल्याने राष्ट्रवादीला वेसण घालण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करण्याचे टार्गेट भाजपने ठेवल्याचेच यातून दिसून येते. अर्थात आता किरीट सोमय्या नव्हे तर मोहित कंबोज या नव्या पात्राचा या भ्रष्टाचारमुक्त मोहिमेत समावेश भाजपने केल्याचे दिसून येते. काल कंबोज यांनी एकापाठोपाठ तीन ट्विट करीत राष्ट्रवादीतील बड्या नेत्याचा भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचे संकेत दिले आहेत.
एवढेच नाही, तर कंबोज यांनी नवाब मलिक व देशमुखांनंतर त्यांचा क्रमांक असल्याचे धाडशी वक्तव्य करून भाजप राष्ट्रवादीवर कशा प्रकारचा दबाव आणतेय, याचेही थेट संकेत दिले आहेत. गेल्या काही दिवसुांपासून राज्यात शिंदे गटात आलबेल नसल्याचे दिसून येत असल्याने हे सरकार टिकविण्यासाठी विरोधकांना मर्यादित ठेवण्यासाठी भाजपने ही चाल खेळली असल्याचे राजकीय वर्तुळात सांगितले जात आहे.