स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे फटाक्यांच्या आतिषबाजीत उत्स्फूर्त स्वागत…!!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्हइंदापूर मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला शहरातून 150 मीटर लांबीचा राष्ट्रध्वज सन्मानाने हातात घेऊन तसेच भव्य तिरंगा मशाल रॅली काढून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे इंदापूरकरांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तसेच हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर शहर भारतीय जनता पक्ष व श्री. पांडुरंग (तात्या) शिंदे मित्र परिवाराच्या वतीने दर्गा मस्जिद चौक ते इंदापूर नगरपालिका अशी भव्य तिरंगा रॅली रात्री काढण्यात आली.
जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग इंदापूरच्या सहकार्याने 150 मीटर लांबीचा राष्ट्रध्वज विद्यार्थिनींनी आणि नागरिकांनी अतिशय आनंदाने, उत्साहपूर्वक व आदरपूर्वक सन्मानाने हातात घेऊन भव्य अशी तिरंगा मशाल रॅली काढली. या रॅलीने संपूर्ण इंदापूरकरांचे लक्ष वेधले. तसेच रात्री 12 वाजता इंदापूर नगरपालिकेच्या परिसरात शोभेच्या फटाक्यांची आतिषबाजीकरीत, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे इंदापूरकरांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’राष्ट्र प्रेमाच्या भावनेने राष्ट्रीय कर्तव्य समजून सर्वजण उत्स्फूर्तपणे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये सहभागी झाले आहेत. हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरावर तिरंगा पहावयास मिळत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण जगाला भारताचे राष्ट्रीय एकात्मता दाखविली.
स्वातंत्रसेनानी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांना मनापासून अभिवादन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने विश्वरूपी नेतृत्व उभे राहिले आहे. प्रचंड इतिहासाची पार्श्वभूमी असणारा, प्रचंड ताकद असणारा भारत देशाचा तिरंगा कायम फडकला पाहिजे. राष्ट्र, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रीय एकात्मता महत्त्वाची आहे.