सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना लागेल तो निधी देण्यात येईल, असे आश्वासन माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. इंदापूर तालुक्यातील गरजूंना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इंदापूर पंचायत समितीच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील डेमो हाऊसचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी भरणे बोलत होते.
यावेळी पंचायत समिती आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते पंचायत समिती सभागृहामध्ये महाआवास अभियान अंतर्गत विहित कालावधीमध्ये घरकुले पूर्ण केल्याबद्दल 75 लाभार्थ्यांचा सत्कार समारंभ व प्रशस्तीपत्रक वाटप करण्यात आले.
भिगवण येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका जयश्री नरके यांच्या भाषणातून भविष्य या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. दरम्यान स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या स्पर्धांचे बक्षीस वितरण भरणे यांच्या हस्ते झाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर तसेच पंचायत समिती इंदापूरचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, डॉ. राम शिंदे तसेच सर्व विभागप्रमुख पंचायत समिती मधील अधिकारी, कर्मचारी शिक्षक तसेच विविध शाळांतील विद्यार्थी पालक उपस्थित होते.