विक्रम वरे – महान्यूज लाईव्ह
ही घटना आहे, बारामती तालुक्यातील निरावागज येथील.. भंटकती करून गावोगावी जाऊन बारा बलुतेदारीचे काम करणाऱ्या लोहारकाम करणाऱ्या मजूराच्या पालावर अचानक आलेल्या वादळी पावसात कडाडणारी वीज कोसळली आणि या मजूराच्या अंगावर पडल्याने त्याचे शरीर भाजले.. दैवजात दुःखे भरता असे गीतेत म्हटले आहे.. प्रचंड अडचणींच्या काळात पुन्हा हा डोंगर कोसळला आणि काय करावे तेच या भटक्या कुटुंबाला कळेना… पण अशावेळी गाव धावून आले… एकीचे बळ या कुटुंबाला सामाजिक संवेदनशीलतेचे खंबीर पाठबळाचे मोठे फळ देऊन गेले..भारताच्या सार्वभौम प्रतिज्ञेप्रमाणेच गावकरी वागले.. म्हणूनच या पालावर काल अभिमानाने तिरंगा फडकला..!
साहेबराव पवार हे मजूर त्याची पत्नी हिराबाई, छोटी मुलगी प्रियांका यांच्यासह गावोगावी फिरून शेतकऱ्यांना खरीपाच्या काळात शेतात लागणारी खुरपे, विळे, कुऱ्हाडी, कोयता यांना धार लावून, ती तयार करून देण्याचे काम करतात. भटकंती करत (गावात रुढ असलेल्या शब्दानुसार घिसाडी समाज) लोहारकाम करणाऱ्या साहेबराव यांचे मूळ गाव उरुळी कांचन आहे.
राहायला मालकीची जागा नाही, शिक्षण नाही, पिढ्यानपिढ्या गावोगावी फिरून हा व्यवसाय करणारा साहेबराव काही दिवसांपूर्वी निरावागज गावात आला. तेथेच मंदिराजवळ पाल ठोकून त्याने हा व्यवसाय सुरू केला. अचानक जोराचा वादळी पाऊस सुरू झाला. यातच कडकडाट होऊन एक वीज पवार याच्या पालाजवळ पडली. मात्र त्या विजेचा झटका एवढा तीव्र होता की, साहेबराव पवार यांचे अर्धे शरीर यात भाजले.
एका क्षणात होत्याच नव्हतं झालं. ही घटना छोटी मुलगी प्रियांका पत्नी हिराबाई पतीचे जखमी शरीर पाहून घाबरल्या. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा करताच जणू आपल्याच घरातील कोणाला तरी जखम झाली आहे, असे समजून त्या काळरात्रीही गावकरी मदतीला धावून आले.
कोणीतरी तातडीने रुग्णवाहिका बोलावली. तातडीने ससून रुग्णालयात साहेबराव पवार यांना पाठवले. मदतीचा पाठपुरावा केला. तेथे उपचार केल्यानंतर साहेबराव यांना पुन्हा निरावागज येथेच आणण्यात आले. शरीरावरील जखमांमुळे त्यांना काम करणे शक्य होत नव्हते आणि पत्नीला त्यांचा कसरतीचा हा व्यवसाय करता येत नव्हता.
या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते हे जाणून पुन्हा गावकरी मदतीला धावले. औषधोपचार, अन्नधान्य तसेच आर्थिक मदत लोक करू लागले. गावातील सुनील देवकाते, संजय सागडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गावकऱ्यांना मदतीचे आवाहन केले आणि गावकऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला.
काल परवा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची तयारी गावात सुरू झाली.. जंगी कार्यक्रम होणार याची कुणकुण लागताच साहेबराव पवार याच्या छोट्या मुलीने प्रियंकाने पुन्हा गावकऱ्यांना विनंती केली की, जसा तुम्ही घरावर झेंडा लावताय, तसा आमच्या पालावर लावा की.. अनं एका क्षणात तिच्या पालावर तिरंगा झेंडा फडकला..
गावाने साहेबराव यांना नवीन शर्ट, पॅन्ट, लुंगी तसेच पत्नी हिराबाई यांना साडी, मुलगी प्रियांका हिला ड्रेस घेतला, हे करत असताना नवीन तंबू विकत घेतला, तसेच आजवरच्या आयुष्यामध्ये आभाळाची चादर आणि धरणीचं अंथरूण पाहूनच पाय पसरणाऱ्या या कुटुंबाला पलंग देखील गावकऱ्यांनी भेट दिला. त्यावर उबदार घोंगडी, नवीन चादर, उशी सर्वकाही देऊन आनंदीमय वातावरण तयार केले.
पवार परिवाराला आर्थिक मदतीबरोबर इतरही मदत केली. देशाचा अमृत महोत्सव पीडित पवार कुटुंबाला मदत करून उत्साहात लोकांनी साजरा केला. भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला. अशा पद्धतीचा खऱ्या अर्थाने भारतीय असल्याचे तत्व दाखवत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निरावागज (तालुका बारामती जिल्हा पुणे) येथे पार पडला. हा आनंदीमय सोहळा पाहून साहेबराव आणि त्यांचे कुटुंब भारावून गेले. यावेळी प्रा. तानाजीराव कुंभार यांनी गावकऱ्यांचे आभार मानले.