बारामती : महान्यूज लाईव्ह
घरचे रागावतात.. प्रेम प्रकरणातून नैराशी येते आर्थिक कारणामुळे अनेक युवकांनी आत्महत्या केल्याच्या आपण घटना ऐकतो, पण बारामती तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. चोरटे स्वप्नात येऊन भीती दाखवतात, हे चोरटे खरोखरच येऊन मारहाण करतील या भीतीने एका युवकाने 28 वर्षाच्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बारामती तालुक्यातील सुपे येथील अक्षय सुरेश कदम (वय 28, रा. सुपा ता. बारामती) या युवकाने आत्महत्या केली. अक्षय कदम याने शुक्रवारी (ता. 12) मध्यरात्रीच्या समारास पंख्याला साडी बांधून गळफास घेतला. याबाबत अक्षयचा मावसभाऊ शेखर शेलार याने दिलेल्या तक्रारीनुसार वडगाव निंबाळकर पोलिसात आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कदम हा सुपा परीसरात मोलमजुरी करुन, कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मागील काही दिवसांपासून गावात फिरतांना, मित्रमंडळींना आपणास स्वप्न पडते व स्वप्नात येणारे चोर मला मारहाण करणार असल्याचे अक्षय सांगत होता.
तो गावातील मित्रांमध्ये तसेच इतरांना देखील आपल्याला पडत असलेल्या स्वप्नाबद्दल व त्यात स्वप्नात येणाऱ्या चोरट्यांबद्दल सांगत असल्याने मित्रमंडळीने देखील सुरुवातीला वेड्यात काढले. मात्र त्याने गुरुवारी म्हणजे आत्महत्येच्या आदल्या दिवशी घरातील इतर मंडळींना देखील स्वप्नातील चोरटे मला मारहाण करणार असल्याची माहिती दिली होती.
दरम्यान घरातील लोकांनी अक्षयची समजूत काढली होती. याच विचारात शक्रवारी रात्री दहाच्या सुमारास अक्षय याने घराची आतून दारे खिडक्या बंद केल्या व तो घऱात झोपण्यास गेला. शनिवारी सकाळी उशिरापर्यंत दार उघडले नाही त्यामुळे घऱातील सदस्यांनी आत डोकावून पाहिले असता, अक्षयने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. वडगाव निंबाळकर पोलिसांनी याबाबत अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
याबाबत अधिक माहिती देतांना वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे म्हणाले, अक्षय कदम यांच्या मावस भावाने दिलेल्या तक्रारीनुसार अक्षयच्या मृत्युची नोंद अकस्मित मृत्यूची नोंद असी केली आहे. मात्र गावातील सरपंच, व कांही नागरीकांकडे विचारणा केली असता, मागील कांही दिवसापासुन अक्षय स्वप्नाबद्दल व चोरट्यांच्या मारहाणीबद्दल बोलत होता. शुक्रवारी झोपण्यापुर्वीही त्याने अशी माहिती दिली होती, अर्थात याबाबत पुर्ण तपास केल्यानंतरच अक्षयच्या आत्महत्येचे नेमके कारण कळणार आहे. असे लांडे यांनी सांगितले.