दौंड: महान्युज लाईव्ह
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील खडकी येथील महामार्गालगत असलेल्या हॉटेल दी पॅलेस समोर असणा-या मोकळ्या जागेत उभ्या टॅंकरमधून ११० लिटर तब्बल ६२ लाख ४३हजार ९२० रुपये किंमतीचे हायड्रोजेनेटेड व्हिजेटेबल ऑइलची प्लस्टिक कॅनमधून होत असलेली चोरी दौंड पोलीसांनी पकडली आहे. याप्रकरणी चार जणांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.
विजय कैलासनाथ यादव (वय ३२ ) राजेश अरूण बाविसकर ( वय २४ दोघे रा. कृष्णान सोमजाईवाडी खोपोली ता. खालापुर जि. रायगड), सोपान दादाराव कथीळकर (वय ३० रा. कटफळ, धामणगाव ता.मोष जि. अमरावती), सुनिल भानुदास देवकाते रा. न्हावी ता. इंदापुर जि. पुणे सध्या रा. खडकी ता. दौंड जि. पुणे ) अशी या चोरांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खडकी येथील हॉटेल पॅलेस समोर टॅकर (नं. एम. एच. ४६, बी. यु. ७८७८) यामधून ११० लिटर हायड्रोजेनेटेड विजेटेबल ऑइलची प्लस्टिक कॅनमधून चोरी करीत असताना पकडले.
त्यांच्याकडील ६२ लाख ४३हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना ताब्यात घेतले आहे. दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गोरख मलगुंडे यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.