सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाची माहिती मिळताच राज्याचे माजी राज्यमंत्री व इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या आकस्मिक जाण्याने एक तडफदार, आक्रमक नेतृत्व महाराष्ट्राने गमावला असल्याचे सांगत माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दुःख व्यक्त केले.
विधिमंडळ कामकाजाच्या निमित्ताने श्री. मेटे यांच्या आठवणींना उजाळा देत असताना श्री. भरणे यांनी सांगितले की, विधान परिषदेच्या कामकाजामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याच्या अनेक महत्त्वाच्या विषयांवरती ते अभ्यासपूर्ण भाषणे करत सभागृहाचे लक्ष वेधायचे.
त्याचबरोबर महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीशी नाळ त्यांची अखेरच्या श्वासापर्यंत टिकून होती.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये श्री.मेटे यांनी आपली पक्ष संघटना वाढवून स्वतःची ताकद निर्माण केली होती. त्यामुळे एक उमद्या मनाचा नेता आज आपल्यातून जात आहे. त्याचे मनस्वी दुःख सर्वांनाच होत आहे.
मेटे कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात सहभागी असल्याचे सांगत श्री. भरणे यांनी विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.