मुंबई : महान्यूज लाईव्ह
मुंबई – पुणे द्रूतगती महामार्गावरील खोपोली येथील भातान बोगद्याजवळ पहाटे पाच वाजता शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा अपघात झाला. हा अपघात झाल्यानंतर मेटे काही वेळ शुध्दीत होते, मात्र तब्बल एक तास कोणाकडूनच मदत मिळाली नाही.. चालकाने सांगितलेला थरार अंगावर काटा आणणारा होता..
विनायक मेटे यांचे चालक एकनाथ कदम हे एअरबॅगमुळे वाचले आहेत. त्यांना दुखापत झाली आहे, मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर विनायक मेटे यांचे अंगरक्षक राम ढोबळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
अपघात झाला, तेव्हा मेटे बसले होते, ती गाडीची डावी बाजू चेपली होती. मेटे यांचे वाहन एका ट्रकवर पाठीमागून आदळले. पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात आणल्यानंतर एकनाथ कदम यांनी ही माहिती दिली.
दरम्यान अपघात घडल्यानंतर रस्त्यावर गाड्या मदतीसाठी थांबवण्यासाठी एकनाथ कदम रस्त्यावर आडवे झाले, पण गाड्या थांबत नव्हत्या.. कदम यांना मुका मार लागला आहे. अखेर कदम यांनी प्रविण दरेकरांच्या सुरक्षारक्षकाला फोन केला आणि त्यानंतर यंत्रणा हलली, मग आम्हाला दवाखान्यात आणण्यात आले असे चालक एकनाथ कदम यांनी सांगितले.