विक्रम वरे – महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जात वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. यामध्ये आता देशांतर्गत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना 30 लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. यापूर्वी हे कर्ज 15 लाख रुपये मिळत होते. अशी माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच परदेशात शिक्षण घेणाऱ्यासाठी 40 लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. याआधी हे कर्ज 25 लाखापर्यंत मिळत होते,असे अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. देशात महागाई खूप वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अडचणी येत आहेत. पालकांना आणि विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संचालक मंडळाने शैक्षणिक कर्जात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच गृह कर्जात देखील वाढ करण्यात आली आहे. गृहकर्जाची मर्यादा 75 लाख करण्यात आली असून व्याजदर 8 टक्के असणार आहे. याआधी ते व्याज 9 टक्के होते. जिल्हा बँकेकडून पगारदारांना देण्यात येणारे कर्ज आता 20 लाख रुपयापर्यंत देणार आहे. आधी ही मर्यादा 15 लाख होती.
वाहनाच्या कर्जाबाबत देखील निर्णय घेतला आहे.वाहनासाठी कर्ज मर्यादा दोन लाखांहून पाच लाख करण्यात आली आहे. तर व्याजदर 10.5 टक्यांवरुन 10 टक्के करण्यात आला आहे. नोटबंदीच्या कालावधीतील 22 कोटी रुपये रिझर्व्ह बँकेने अद्याप स्वीकारलेले नाहीत. यासाठी सर्वोच्च न्यायालयात खटला सुरु आहे. राज्यातील वेगवेगळ्या बँकांची अशी रक्कम 90-100 कोटी रुपये इतकी असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.