संपादकीय
सध्या देशात काय सुरू आहे?…. तुम्ही म्हणाल.. आझादी का अमृतमहोत्सव.. हिंदू मुस्लीम वाद… लालसिंग चड्डा स्क्रीनवर कोसळला.. आणि बरेच काही… पण आणखी एक महत्वाची गोष्ट सध्या देशात सुरू आहे.. विशेषतः मोदी सरकार सत्तेत आल्यापासून ज्या माध्यमांकडून मोदी सरकारचे सामान्यांना जिकीरीचे ठरतील असेही मुद्दे कसे योग्य आहेत हे चर्वितचर्वण करून सांगितले जाते, त्या माध्यमांकडून एक बातमी पेरली जात आहे, ती म्हणजे भारत हिंदूराष्ट्र होणार याची..! अर्थात म्हटले तर ती बातमी आहे.. ती मुद्दामहून पेरण्याची… जर जनता आक्रसून उठलीच, तर त्यात तथ्य नाही असे सांगण्याचीही तयारी पुढे आहेच..!
सुरवातीला ही बातमी काय आहे ती पाहू… तर बातमी अशी आहे की, भारत हिंदूराष्ट्र घोषित केले जावे यासाठी सन २०२३ मध्ये होणाऱ्या माघी मेळाव्यात हिंदूराष्ट्राची संकल्पना साधूसंतांकडून मांडली जाणार आहे आणि त्या धर्मसंसदेत ती मंजूरही केली जाणार आहे. त्यामध्ये अर्थातच स्वतंत्र घटना असावी असा एक ठराव यापूर्वीच फेब्रुवारी २०२२ मध्ये धर्मसंसदेत मांडला होताच. आता त्याची घटना बनविण्याचे काम सुरू आहे अशी नवी बातमी समोर आली आहे.
ही बातमी अर्थातच तशी सांगोपांगी आहे.. तथाकथित सूत्रांच्या म्हणण्यानुसारची आहे.. मात्र देशातील आघाडीच्या प्रसारमाध्यमांनी यात वाराणसीतील शंकराचार्य परीषदेचे अध्यक्ष स्वामी आनंदस्वरुप यांचा हवालाही दिला आहे. शांभवी पिठाधीश्वरांच्या संरक्षणात ३० साधूसंतांचा समूह या नव्या हिनंदू राष्ट्राच्या घटनेचा मसुदा तयार करत असल्याची माहिती यामध्ये देण्यात आली आहे.
दरम्यान या नव्या हिंदूराष्ट्राची घटनादेखील नवी असणार आहे असे सांगितले जात असून ही घटना ७० पानांची असेल. यात धार्मिक, अध्यात्मिक, आर्थिक, सामाजिक स्तरावर काम करीत असलेल्या तथाकथित तज्ज्ञा्ंच्या चर्चेतून ही ७० पानांची घटना ३०० पानांची घटना तयार केली जाणार आहे, अर्थात ती अर्धीच असेल व येणाऱ्या २०२३ मधील मेघमेळ्यात धर्मसंसद होईल, तेव्हा ती अर्धी घटना सादर केली जाईल.
या संभाव्या हिंदूराष्ट्रात सर्व जातींना, धर्मांना राहण्याची सुविधा व सुरक्षा असेल. मात्र इतर धर्मातील नागरिकांना मतदानाचा अधिकार राहणार नाही. विशेषतः ख्रिश्चन व मुस्लीमांना मतदान वगळता इतर सर्व अधिकार असतील. वाराणसी म्हणजे श्रीक्षेत्र काशी ही राजधानी असेल. अखंड भारताचा नकाशा असेल. शेतीचे क्षेत्र करमुक्त, प्रत्येकाला सैन्य प्रशिक्षण बंधनकारक असेल. शिक्षण पध्दत गुरूकुल पध्दतीची असेल. आय़ुर्वेद, गणित, ज्योतिष या सगळ्यांचे शिक्षण दिले जाईल.
आता ही झाली बातमी.. ती वरपांगी आहे असे कोणी म्हणाले, तर तेही बरोबर आहे..आणि ती गांभिर्याने घ्यायची आहे असे कोणी म्हणाले, तर तेही बरोबरच आहे. कारण गेल्या काही वर्षात शासनाकडून शासन निर्णय समजत नाहीत, ते शासनापेक्षा सोशल मिडियातून पेरल्या जाणाऱ्या पध्दतशीर बातम्यांमधूनच समोर येतात. अनेक सरकारी निर्णय अगोदर सोशल मिडियात पेरून लोकमताचा अंदाज घेऊन, समाजाची मानसिकता लक्षात घेऊन मग घेतले गेले आहेत हे सर्वांनाच माहिती आहे.
त्यामुळे मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून ज्या पध्दतीने साधुसंता्ंचे आखाडे सक्रीय झाले आहेत, ते पाहता ही बातमी अगदीच खोटी असेल असे म्हणायलाही धाडस लागेल. अर्थात येत्या काही दिवसांत भारत हिंदूराष्ट्रच कसे व्हायला पाहिजे याच्या बातम्या हळूहळू पध्दतशीर पेरल्या जातील. माध्यमांमधील धार्जिणे संपादक, पत्रकार याची हवा कधी भरेल याकडे जाणीवपूर्वक लक्ष देतील. अशी घटना नसल्याने आपला भारत किती फाजिल लोकशाहीचा झाला आहे हेही पटवून देण्यासाठी स्पर्धा करतील.
हे दिवस फार दूर नाहीत. मात्र समाजातून तीव्र प्रतिक्रिया आताच उमटू लागल्या तर ही लिटमस टेस्ट आटोपती घेतली जाईल. अर्थात काहीही असले तरी विरोधकमुक्त भारत ही स्लोगन ज्या पध्दतीने भारतात रुढ केली गेली, त्याला कोणी विरोध केला नाही, त्यानंतर भाजपचे बडे नेतेही प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाबद्दल थेट बोलू लागले, त्याप्रमाणे या धार्मिक बातमीविषयी कोणत्याच प्रतिक्रिया उमटल्या नाहीत, तर त्याचा पुढील एपिसोडही लवकरच समोर येईल. त्यामध्ये घटना कशी पूर्ण बनलेली आहे, ती कशी उज्वल भारतासाठी महत्वाची आहे, याचे दाखले देण्यासही सुरवात येत्या काळात झालेली असेल.. तो काळही फार दूर नाही.