बारामती महान्यूज लाईव्ह
शेतात भावाने एक लाकडाचे ओंडके आडवे टाकले, म्हणून वैतागलेल्या दुसऱ्या भावाने कुऱ्हाडीने वार केला आणि भावाचा जीव घेतला.. ही घटना बारामती तालुक्यातील मोढवे येथील मोटे वस्ती येथे १२ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वादोन च्या सुमारास घडली.
पायाच्या पिंडरीवर घाव घातल्याने जखमी होऊन तायाप्पा सोमा मोटे यांचा मृत्यू झाला. यावरून तायाप्पा यांची सून लक्ष्मी महादेव मोटे यांनी वडगाव निंबाळकर पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून रामा सोमा मोटे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.
ही घटना रामा सोमा मोटे यांच्या घरासमोर घडली. रामा मोटे यांनी शेतात जायच्या वाटेवर एक लाकडी ओंडके आडवे टाकले होते. ते जाणूनबूजून टाकल्याचा संशय तायाप्पांना होता. त्यांनी यासंदर्भात रामा सोमा मोटे यास विचारणा केली व वाटेवर लाकडी ओंडके का टाकले असा जाब विचारला असता रामा सोमा मोटे याने या रस्त्याने तू जायचे नाही, तुला जीवंत सोडणार नाही, तुला खल्लासच करतो अशी भाषा वापरत तायाप्पाच्या हातातील कुऱ्हाड हिसकावली व तायाप्पाच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला.
तो वार तायाप्पा यांनी चुकवला, मात्र कुऱ्हाड त्यांच्या पायाच्या पिंडरीवर लागली. घाव वर्मी लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यात गंभीर जखमी होऊन तायाप्पा यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक सोमनाथ लांडे करीत आहेत.