दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यात वाहन चोरी व घरफोड्यांच्या घटनेत वाढ झाल्यानंतर यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी काही दिवसांपूर्वी नागरिकांनी काळजी घेण्याबाबत जनजागृती केली होती. मात्र नागरिक याकडे लक्ष देत नाहीत, त्यामुळे एकीकडे नागरिकांचे नुकसान व दुसरीकडे पोलिसांची वाढलेली डोकेदुखी असे चित्र आहे.
नागरिक स्वतःच्या घरादाराची व वाहनांची व्यवस्थित काळजी घेत नसल्याने वाहन चोरीच्या प्रकारात वाढ झाली आहे, मागील आठ दहा दिवसांत चार दुचाकी व घरफोडी करून पावणे दोन लाखांचा सोने दागिन्यांचा ऐवज अज्ञात चोरांनी चोरी केल्याची घटना घडली.
दरम्यान, या चोऱ्या शोधण्याचे काम पोलिस करीतच आहेत, मात्र त्याबरोबरच चोऱ्या घडू नयेत यासाठी नागरिकांनीही स्वतःहून काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. दुचाकी व चारचाकी वाहने व्यवस्थित पार्किंग करून, ती लॉक झाल्याबाबतची दक्षता घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. त्यानंतरही वाहने चोरीला जातच आहेत.
पोलिस त्यांचे काम करतीलच, मात्र गावातही ग्रामसुरक्षा दले सतर्क करण्याचे आवाहन यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. मात्र त्याचा अनुकूल परिणाम झाल्या्चे दिसत नसल्याने पोलिसही चिंतेत आहेत.
नुकतीच यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत यवत येथून हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची एक दुचाकी, चौफुला – बोरीपार्धी येथील यशराज होंडा शोरूम मधून दोन दुचाकीची व मिरवडीतील घरासमोर लावलेली होंडा कंपनीची एक दुचाकी अशा चार दुचाकी चोरीस गेल्या आहेत. मिरवडी येथे एका घरात अज्ञात चोरट्यांनी १ लाख ७५ हजार रुपयांच्या सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत.
या साऱ्या पार्श्वभूमीवर गावागावात ग्रामसुरक्षा दले सतर्क करण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू आहे त्याला नागरिकांनीही प्रतिसाद देऊन आपल्या गावाची जबाबदारी काही अंशी आपलीही आहे असे समजून काम करण्याची गरज आहे.