मुंबई महान्यूज लाईव्ह
बॅंकांकडून दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी गेल्या दशकभरात वसुली एजंट नेमण्याची प्रथा पडली. आता तर राज्याच्या ग्रामीण भागात, अगदी वाड्यावस्त्यांवरही दहा टक्के कमिशनवर वसुली एजंट नेमले जात आहेत आणि त्यांच्याकरवी बॅंका दहशतीचे साम्राज्य निर्माण करीत आहेत. अशा बॅंकांच्या पध्दतीला व एजंटांच्या कृतीला चाप लावण्यासाठी कालपासून रिझर्व्ह बॅंकेने नियमावली जारी केली आहे.
नव्या नियमावलीनुसार बॅंकेने कर्जदाराला कधी फोन करायचा, कोणत्या वेळेत करायचा, कोणत्या वेळेत करायचा नाही याच्या सूचना व निर्देश दिले आहेत. दुसरीकडे वसुली एजंटांना खातेदार अथवा कर्जदाराला धमकावता येणार नाही. अपशब्द वापरता येणार नाहीत अशाही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
अवेळी कॉल करून त्रास देणे, फोनवरून कर्जासाठी धमकावणे असले प्रकार आता चालणार नाहीत असे रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले आहे. ही नियमावली आता देशभरातील शेड्युल्ड बँका, नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या आणि इतर बँकांसाठी असून त्यांच्यासाठी कर्ज वसुलीसंदर्भात काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
नव्या सूचनांनुसार बँक रिकव्हरी एजंट यांनी कर्जवसुलीसाठी अवेळी फोनवर कॉल करू नये, कर्जदारांना धमकावू नये किंवा त्रास देऊ नये अशी सूचना दिली आहे. कर्जदारांना कॉल करण्यासाठी वेळा घालून दिल्या आहेत, त्याच वेळेत बॅंका व एजंटनी कर्जदारांशी संपर्क साधावा असे निर्देश रिझर्व्ह बॅंकेने दिले आहेत.