जालना महान्यूज लाईव्ह
जालन्यात स्टील उद्योजकांवर छापा पडल्यानंतर आता पुन्हा एक नवा ट्विस्ट पुढे येतोय… फक्त सहा उद्योजकांकडेच ३९० कोटींचा खजिना हाती लागला.. अजून ३० उद्योजकांचे ३० लॉकर उघडायचे आहेत. त्यामुळे आता फक्त ट्रेलर झाला, पिक्चर अभी बाकी है असे सांगितले जात आहे.
जालन्यात स्टील व्यवसायाचे मोठे भांडार आहे. विशेषतः देशातील सर्वात मोठा स्टील व्यापारही जालन्यात होतो. जालन्यातील स्टील उद्योजक हे मोठ्या प्रमाणावर कर चुकवेगिरी करतात, खरा व्यवसाय लपवतात अशी टीप आयकर खात्याला मिळाली होती.
त्यावरून १२० अधिकाऱ्यांचे वऱ्हाड भल्या पहाटे दुल्हन हम ले जायेंगे असे फलक लावून १२ वाहनांसह जालन्यात थडकले. सामान्यांना हे सारे लोक कोणाच्या तरी लग्नासाठीच आले असतील असे वाटले नसेल तरच नवल.
मात्र या वऱ्हाडाने जेव्हा अचूक ठिकाणीच जायला सुरवात केली. जिथे पाहावे, तिकडे दुल्हन हम ले जायेंगे या फलकाच्या गाड्या, त्याही गर्भश्रीमंत व्यावसायिकांच्याच दारात दिसू लागल्याने अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि ती खरीही ठरली. जालना शहरातून काही वेळानंतर या सर्व गाड्या जालन्याबाहेर गेल्या..
अनेकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. काहीच आढळले नाही अशा तोऱ्यात सारेजण राहीले. मात्र आयकर खात्याला मिळालेली खबर काही ऐसीवैसी नव्हती. साहजिकच आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी अचूक मिळालेल्या माहितीचा उपयोग करीत व्यावसायिकांच्या रंगेल ठिकाणी म्हणजेच आलिशान फार्महाऊसला लक्ष्य केले. फार्महाऊसमधील गाद्या, बेडसह शेतीच्या औजारांसाठी बनवलेल्या अडगळीच्या स्टोअर रूमही अधिकाऱ्यांनी सोडल्या नाहीत.
याच खोल्यांमध्ये त्यांना करचुकवेगिरी केलेला कुबेराचा खजिना हाती लागला. तब्बल ३९० कोटींचे घबाड त्यांच्या हाती लागले. ५९ कोटींच्या नोटा मोजण्यासाठी त्यांना १२ मशीन मागवाव्या लागल्या. १२ अधिकाऱ्यांची पथके करून दोन शिफ्टमध्ये १४ तास ही मोजणी झाली. हिरे, जडजवाहिर आणि सोन्यांची मोजदाद करण्यासाठीही सराफी व्यावसायिकांना बोलवावे लागले.
आता याचा पुढचा भाग क्रमश: पुढे येतोय. ६ उद्योजक झाले, ते बडे होतेच, मात्र आणखी ३० जणांचे लॉकर आयकर विभाग उघडतोय. यामध्ये किती खजिना दडलेला आहे याची माहिती लवकरच समोर येईल. मात्र पाच दिवसांनंतर आय़कर विभागाने प्रसिध्दीस दिलेल्या यापूर्वीच्या धाडीची छायाचित्रे पाहिल्यानंतर कदाचित या नियोजित ३० उद्योजकांचीही बोबडी वळाली असेल.
अर्थात याचा मोठा परिणाम जालना एमआयडीसीतील उद्योगांवर झाला आहे. येथील उलाढाल ३० टक्क्यांनी घटली असून भंगार व्यावसायिकांनी येथील सारी गडबड पाहून खरेदी आणि विक्रीतही आपला हात आखडता घेतला आहे. साहजिकच जेव्हा मोठे मासे गळाला लागतील, तेव्हा छोट्यांनाही त्रास होणार आहेच.