बारामती महान्यूज लाईव्ह
बांधकाम झाल्यानंतर उर्वरित रक्कम न देता जादा रकमेचा दिलेला धनादेश वटला नाही, पैशाची मागणी केल्यानंतर पत्नीची फर्म असताना पतीने मालक म्हणून स्वाक्षरी केली असल्याने आम्ही पैसे देणे लागत नाही असे सांगितल्याने बारामतीतील बांधकाम व्यावसायिकाची १९ लाख ९८ हजारांची फसवणूक झाली. त्यावरून शहर पोलिस ठाण्यात जेजूरीच्या पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, मनोज लक्ष्मण पोतेकर यांनी शहर पोलिसांकडे फिर्याद दिली असून त्यावरून शहर पोलिसांनी पंकज गुजर व श्रध्दा पंकज गुजर (दोघेही रा. जेजूरी ता. पुरंदर, जि. पुणे) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मनोज पोतेकर यांच्या फिर्यादीनुसार ट्रायो बिल्डकॉन कंपनीमार्फत जेजूरी येथील रजनी हेल्थ केअर कंपनीच्या मालक श्रध्दा गुजर यांच्याशी बांधकामाचा करार झाला. हा करार साडेतीन कोटींचा होता. त्यामध्ये जीएसटी मिळून ३ कोटी ७५ लाख रुपये येणे होते. त्यापैकी काही रक्कम जमा झाली, मात्र उर्वरित ४८ लाख २३ हजार रुपये येणे होते. त्यामधून १५ लाख ७५ हजार रुपये गुजर यांनी कंपनीच्या खात्यात भरले. त्यानंतर प्रतिमहिना अडीच लाख रुपये प्रमाणे ५ महिने मिळून १२ लाख ५० हजार रुपये दिले. मात्र उर्वरित १९ लाख ९८ हजार रुपयांची रक्कम गुजर यांनी दिली नाही. त्यापोटी २५ लाख रुपयांचा धनादेश दिला. तो न वटता परत आल्यानंतर जेव्हा पैशासाठी फोन केला, तेव्हा जेजूरीत गाडी अडवून आमचा हिसका दाखवू अशी धमकी दिल्याचे पोतेकर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
दरम्यान श्रध्दा गुजर यांनी करार मी केलाच नव्हता, पंकज गुजर यांनी तुमच्यासमवेत करार केला असल्याने टीडीएसपोटी करातीचे ८६ हजार रुपये देखील आम्ही भरणार नाही असे सांगितले. त्यामुळे श्रध्दा गुजर व पंकज गुजर यांनी आमची फसवणूक केल्याचे सांगत पोतेकर यांनी शहर पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून वरील गुन्हा दाखल करण्यात आला असून बारामती पोलिस पुढील तपास करीत आहेत.