बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती नगरीचे ज्येष्ठ नगरसेवक व नटराज नाट्यमंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांच्या घराला आज अचानक सकाळी आग लागली. या आगीत वरचा मजला जळून खाक झाला.
किरण गुजर यांचे बारामती शहरातील खाटिकगल्ली येथे निवासस्थान आहे. आज सकाळी गुजर हे नटराज नाट्यमंडळाच्या कार्यालयात असताना घरी अचानक आग लागली. ही आग दुसऱ्या मजल्यावर लागली व अल्पावधीतच फर्निचर, कपडे व लाकडी साहित्य यामुळे ती भडकली.
त्यानंतर माहिती समजताच गुजर यांनी अग्नीशमन दलाला सूचना केली आणि नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या मजल्यावर कोणीही नव्हते. तसेच स्वयंसेवक व स्थानिकांनी वेगाने केलेल्या मदतकार्यामुळे वेळीच आग आटोक्यात आली व इतरत्र मजल्यावर अथवा कोठेही ती पसरली नाही.
मात्र या आगीत गुजर यांच्या घरातील मोठे नुकसान झाले. दुसऱ्या मजल्यावरील फर्निचर, कपडे व इतर साहित्य या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. गुजर हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. तसेच कला, नाट्य, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा राज्यस्तरावरील वावर असल्याने ते राज्यभरात परिचित आहेत.
गुजर यांच्या या दुसऱ्या मजल्यावरील घरात नाट्य, कला क्षेत्राशी संबंधित जुन्या सीडीज, पुस्तके, संगीत तबकड्या, ग्रामोफोन असे साहित्य होते. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज असून या आगीत सुमारे ३० ते ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले अशी माहिती सूत्रांनी दिली.