दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील कानगाव हद्दीत भीमा नदीपात्रातील वाळू उपसा बंद झाला. बऱ्याच काळानंतर त्यावर टाच आली.. किंबहूना चारआण्याची कोंबडी व बारा आण्याचा मसाला होऊ लागल्याने वाळूमाफियाही कंटाळले.. पण अशी झटपट पैशाची सवय लागलेली, ती सहजासहजी कशी संपेल?
आता वाळूचा धंदा बंद झालाच आहे, तर तसाच काहीसा धंदा शोधावा लागेल, म्हणून मग वाळूमाफियांनी चक्क दारु विक्रीचा धंदा सुरू केला, खुलेआम एका हॉटेलमध्ये बेकायदा बिअर बार चा व्यवसाय एकाने सुरू केला आणि तो अल्पावधीतच तेजीतही आला अशी चर्चा या परिसरात सुरू आहे.
बरं आता ही गंमत नाही की, दिवसरात्र खुलेआम सुरू असूनही या बेकायदा बिअर बार शॉपीचा वास दौंडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला आला नसेल, तरच नवल..! तिकडे इंदापूराच्या सोलापूर जिल्ह्याला शिवणाऱ्या टोकापर्यंत कोठे खुट्ट वाजले की, पळत जाणारे अधिकारी, कर्मचारी त्यांच्या उशाला काय घडतेय याची माहिती ठेवत नसतील असे म्हणायला धाडसच म्हणावे लागेल.
मात्र यावर ना राज्य उत्पादन शुल्काची नजर आहे, ना यवत पोलीसांची! कानगाव ते मांडवगण फराटा रस्त्यालगत मागील काही दिवसांपासून सुरू असलेले हे हॉटेल सध्या चर्चेत आणि नागरिकांच्या नाराजीच्या केंद्रस्थानी आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या चर्चेनुसार या हॉटेलमध्ये देशी-विदेशी मद्याची विक्री खुलेआम केली जात आहे. या ठिकाणी कानगाव ,मांडवगण व आजूबाजूच्या मद्यपींची मोठी गर्दी असते. त्यामुळे या ठिकाणी मद्यपान केल्यानंतर आपापसात शिवीगाळ, शाब्दिक चकमक व किरकोळ हाणामारीच्या घटना सातत्याने घडत असतात.
कानगाव – मांडवगण रस्त्यावरुन ये- जा करणाऱ्या प्रवाशांना या मद्यपींच्या धिंगाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच या हॉटेलजवळच लोकवस्तीही आहे, मात्र हे व्यवसाय करणारे परिसरातील स्थानिक असल्याने पोलीसांकडे तक्रार न करता गुपचूप त्यांचा त्रास सहन करत आहेत.
यापूर्वी कानगाव, गार हद्दीत भीमा नदीपात्रात यांत्रिक बोटीच्या सहाय्याने बेकायदा वाळू उपसा व वाळू वाहतूक चोरीचा धंदा करणाऱ्यांवर वाळू चोरीचे दौंड वन विभाग व यवत पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल आहेत. आता वाळू उपसा व वाहतूक बंद झाल्याने सवय सुटत नसल्याने असे व्यावसायिक दारुकडे वळले आहेत.
सध्या तो व्यवसाय पोलीसांच्या आशीर्वादाने जोमात सुरू आहे. पोलीसांनीच आम्हाला हा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली असल्याचे ते कानगाव परिसरात खुलेआमपणे सांगत आहेत. तसेच संबंधित व्यवसायिकांचे पोलीस स्टेशनला सातत्याने ये- जा होत असल्याचे कानगाव परिसरातील अनेक ग्रामस्थांनी पाहिले आहे. त्यामुळे लेखी व उघडपणे करायची कोणाकडे, तर पोलीसांच्याकडे तक्रार करण्यास सर्वसामान्य नागरिक धजावत नाहीत .दरम्यान, याबाबत यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी याविषयी माहिती घेऊन या ठिकाणी ठोस अशी कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगितले.