सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
काल संध्याकाळी सहा वाजता वीर धरणाचे सात दरवाजे चार फूटांनी उचलले होते आणि निरा नदीत तब्बल ३२ हजार ६५९ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते. आता आज (ता.१२) सकाळी साडेसहा वाजता वीर धरणातून आणखी १० हजार क्युसेक्स पाणी अधिक सोडण्यात आल्याने नीरा नदीला महापूराची स्थिती निर्माण झाली आहे.
मागील वर्षाप्रमाणेच इंदापूर व बारामती तालुक्यातील निरा नदीच्या कडेच्या भागातील शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून नदीपात्राकडे कोणी जाऊ नये असे आवाहन जलसंपदा खात्याने केले आहे.
निरा नदीचा विसर्ग २४ हजार ३८५ क्युसेक्सवरून काल संध्याकाळी सहा वाजता ३२ हजार ४५९ क्युसेक्सवर तो वाढविण्यात आला. आज सकाळी पावसाच्या पाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन हा विसर्ग १० हजार क्युसेक्सने वाढवून ४२ हजार क्युसेक्सवर पाणी विसर्ग वाढला आहे.
आज दुपारी निरानदीला महापूराची स्थिती…
दरम्यान वीर धरणातून सोडलेले पाणी वाढण्यास आज सकाळी अकरानंतर सुरवात होण्याची शक्यता असल्याने निरेकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सकाळी अकरानंतर निरा नदीच्या इंदापूर व बारामती तालुक्यातील हद्दीत महापूराची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. चिखली येथील निरा नदीचा बंधारा आज सकाळीच बुडला.. दुपारनंतर ही स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. सर्व बंधारे पाण्याखाली जातील, अथवा काही बंधाऱ्यांच्या पुलापर्यंत पाणी पोचेल अशी चिन्हे आहेत.