रक्षाबंधनच्या दिवशी बेपत्ता तरुणीचा विहिरीत मृतदेह आढळला
घनशाम केळकर – महान्यूज लाईव्ह
पुणे – सातारा महामार्गाच्या लागून असलेल्या कामथडी ( ता. भोर) येथील २१ वर्षीय तरुणी शनिवारी बेपत्ता झाली होती. आज (गुरुवारी) याच तरुणीचा मृतदेह विहीरीत आढळला. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीचा मृतदेह पाहून एकुलत्या भावाचा बांध फुटला.
स्मिता चंद्रकांत परखंदे (वय २१ रा. कामथडी, ता. भोर ) ही तरुणी शनिवारी दि. ६ रोजी राहत्या घरातून बेपत्ता झाली होती. या प्रकरणी पोलिसांकडेही बेपत्ता झाल्याची नोंद दाखल करण्यात आली होती. आज गुरुवारी ( दि. ११ ) घरापासून जवळपास अर्धा किमी अंतरावर असलेल्या शेतातील विहिरीत तिचा मृतदेह तरंगताना आढळला.
घटनेची माहिती समजताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक सचिन पाटील, उपनिरीक्षक संजय सुतनासे राजगड पोलिस कर्मचारी तात्काळ दाखल होत नागरिकांच्या मदतीने विहिरीतील मृतदेह बाहेर काढला.
दरम्यान, बेपत्ता तरुणी मानसिक आजाराने त्रस्त असून तिच्यावर खाजगी डॉक्टरकडे उपचार सुरू होते. बेपत्ता झाल्यानंतर राजगड पोलीस स्टेशनमध्ये तिच्या आईने खबर दिली होती. तिने नैराश्यातून विहिरीत उडी मारली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान ती बेपत्ता झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य पाहून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी देखील जातीने लक्ष घालून तपास करण्यावर भर दिला होता. मात्र दुर्दैवाने तिचा मृतदेह विहिरीत आढळला. या प्रकरणी राजगड पोलिस पुढील तपास करीत आहेत.