यशोगाथा – विक्रम वरे, बारामती
बारामती तालुक्यातील काटेवाडी या गावचा हा सुपुत्र… आज महाराष्ट्राला पुरोगामी विचारसरणीतून विविध घटनांमध्ये असलेल्या सहभागामुळे परिचित असला, तरी नव्या पिढीला काटेवाडीपासून दुबईपर्यंतच्या व्यवसायिक कर्तृत्वाची दिशा देण्याचा अमोल काटेंचा प्रयत्न तेवढाच सुपरिचित ठरला आहे. समाजकारणाबरोबरच उदरनिर्वाहाच्याही चार गोष्टी लक्षात आणून देतानाच गेली अनेक वर्षे कितीही उंची गाठली, तरी जमीनीशी घट्ट पाय रोवून सर्वांशी आपुलकीने वागणारे अमोल काटे युवकांमध्ये व उद्योजकांमध्ये लोकप्रिय आहेत.
अमोल काटे हे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष आहेत. विविध सामाजिक आंदोलनांमुळे ते महाराष्ट्रातील युवकांपर्यंत पोचले. मात्र सैन्य केवळ उपदेशातून चालत नाही, तर त्यालाही पोट असते, याच भावनेतून जे जे कोणी युवक संपर्कात येतील, त्यांना उद्योजकतेची, व्यावसायिकतेची दिशा देणारे अमोल काटे युवकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. सन २००६-७ चा काळ असेल, काटेवाडीतील हा चुणचुणीत पोरगा हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सौ. सुनेत्रा पवार यांनी गावात सुरू केलेल्या ग्रामविकास अभियानात भाग घेताना जी उत्सुकता दाखवून गेला, तीच उत्सुकता आजही प्रत्येक नव्या व्यक्तींना भेटण्यासाठी व जुन्यांना सल्ला देण्यासाठी उत्सुक असतो.. हे अमोल काटे यांचे विशेष..!
शालेय शिक्षण घेतानाच स्वावलंबनाचा धडा गिरवताना अमोल काटे यांनी अर्धवेळ नोकरी स्विकारली. तेवढ्यावर न थांबता स्वतःचा इंटरनेट कॅफे सुरू केला. मित्रांसोबत बांधकाम व्यवसायात उतरून बांधकाम व्यवसायातही यशस्वी उडी घेतली. उद्योजक मामांच्या बोटाला धरून वेगवेगळ्या व्यवसायांची मुहूर्तमेढ रोवली आणि अल्पावधीतच एक यशस्वी उद्योजक म्हणून ठसाही उमटवला. हे सारे करताना आपले सामाजिक कार्य महत्वाचे आहे हे समजून समाजातील घडणाऱ्या घडामोडी, त्याचा युवकांच्या आयुष्यावर होणारा परिणाम, हे शोधण्यासाठी अगदी खोलात जाऊन अभ्यास करण्याची वृत्ती यामुळे अमोल काटे विचारवंतांमध्येही लोकप्रिय झाले आहेत.
शिवनेरीवरचे आंदोलन, मराठा आरक्षणावेळचा सहभाग, युवकांचे संघटनकौशल्य, दादोजी कोंडदेवाचा पुतळा, भांडारकर हल्ला, गडकरी पुतळ्यापासून ते विविध आंदोलनावेळी अमोल काटे यांची भूमिका अनेकांना हत्तीची ताकद देऊन गेली. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या युवकांपासून ते राज्यातील सर्वोच्च नेत्यांपर्यंतचा सहज वावर आणि गडकिल्ल्यांपासून, ऐतिहासिक, धार्मिक ते सामाजिक व वर्तमान स्थितीपर्यंतचा पुरेपूर अभ्यास ही अमोल काटे यांची वैशिष्ठ्ये त्यांच्या प्रेमात पाडण्यासाठी पुरेशी आहेत…! अमोल काटे यांच्या या वाढदिवसाच्या निंमित्ताने त्यांना शुभेच्छा..! त्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील विकासाची वाट शोधण्यासाठी आतुर असलेल्या नवयुवकांना दिशा मिळावी व त्यांच्यातही उद्योजकतेचे, व्यावसायिकतेचे पंख लागावेत हीच अपेक्षा….!