बारामती : महान्यूज लाईव्ह
मागच्या दोन लोकसभा निवडणूकांपासून बारामती जिंकण्यासाठी भाजपकडून ताकद लावली जात आहे. पहिल्या मोदी लाटेत महादेव जानकरांनी बेसावध राष्ट्रवादीला हातघाईवर आणल्यानंतर मागच्या लोकसभा निवडणूकीत कांचन कुल यांनीही लढत दिली.. आता ऐन वेळी निवडणूक लढणार नाही असा पवित्रा घेत बारामतीसाठी सबकुछ करण्याच्या तयारीत भाजप उतरला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याच्या पंधरवड्याचा मुहूर्त बारामती लोकसभा मतदारसंघासाठी निवडण्यात आल्याचे समजते. या ऑगस्टपासून बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या तयारीला सुरवात होणार असल्याचे समजते.
खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे बारामतीची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती यापूर्वीच दिल्लीतून मागील दोन महिन्यांपूर्वीच पेरलेली आहे आणि ती बहुतेकांना माहिती आहे. मात्र प्रत्यक्ष फिल्डवर कामकाजाला सुरवात ऑगस्ट महिन्यापासून होत असल्याने संघटनपातळीवर राष्ट्रवादीला सर्व पर्याय वापरून संघटन वाढविण्याची हातोटी असलेल्या भाजपशी दोन हात करावे लागणार आहेत.
देशातील १५० मतदारसंघ पारंपारिक आहेत व गेली कित्येक वर्षे भाजपला अशा मतदारसंघात प्रचंड प्रयत्न व ताकद लावूनही विजय मिळालेला नाही. त्यामध्येच बारामती मतदारसंघ आहे. भाजपला गेली अनेक वर्षे शिवसेनेशी युती व बारामती मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने तेथे लढत देता आली नव्हती, मात्र युती तुटल्यानंतर भाजपने येथे हळूहळू लक्ष घातले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, दुर्गा वाहिनी, बजरंग दल, विहींप यांच्या स्वयंसेवकांची वाढत चाललेली संख्या, दौंड, खडकवासला मतदारसंघात भाजपची असलेली निर्णायक ताकद व आता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात निर्माण झालेली ताकद या साऱ्यांचा विचार करीत भाजपने बारामतीवर लक्ष केंद्रीत केले आहे. या मतदारसंघात बारामती वगळता इतर तालुक्यांमध्ये कॉंग्रेसी व पुरोगामी विचाराच्याच नाराजांची मोट बांधून राष्ट्रवादीचे कच्चे दुवे हेरून त्यांच्याच विरोधात या कार्यकर्त्यांना उभे करण्यासाठी सर्वतोपरी तयारी भाजपने केली आहे.
ऑगस्ट महिन्याची का केली निवड?
ऑगस्ट महिन्यातच भाजपने या साखरपेरणीची सुरवात का केली आहे, त्यामागेही योगायोग आहे. भाजप कोणतीही निवडणूक गांभिर्याने घेतो आणि त्यासाठी पराभव जिथे आहे, तिथेही ते अगोदरच काही काळापासून बांधबंधिस्ती करतात, अमेठी मतदारसंघाप्रमाणे बारामती मतदारसंघावर विजय मिळवणे शक्य नाही हे भाजपचे नेतेही जाणून आहेत, म्हणूनच ऑगस्ट २०२४ पर्यंत लोकसभा निवडणूक होऊन जाणार आहे, तेव्हा बारामती हा भाजपच्या खासदाराचा मतदारसंघ असेल या दृष्टीने तयारीला सुरवात केली आहे. त्यासाठी ठराविक काळात एक केंद्रीय मंत्री बारामतीला भेट देईल असे नियोजन केले जात असल्याची माहिती महान्यूजला मिळाली आहे.
निर्मला सीतारामन बारामतीत येतील त्यादृष्टीने महाराष्ट्र भाजपने तयारी सुरु केल्याचे समजते. ऑगस्ट च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बारामतीला भेट देण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी यापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडे दिली आहे. बारामती मतदारसंघातील धनगर समाजाची संख्या लक्षात घेऊन ही जबाबदारी शिंदे यांच्याकडे देण्यात आल्याचे समजते. शिंदे यांच्यासह ज्येष्ठ नेते व माजी मंत्री विनोद तावडे यांच्यासह इतरही नेत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती असून आता यात नेमके काय घडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.