दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील यवत येथे अज्ञात चोरटयाने एक दुचाकीची चोरी केली आहे. तर एका बंगल्यात जबरी चोरी केली असून दागिन्यांसह १ लाख चार हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकी चोरीसह घरफोडीच्या घटनेत अलीकडे वाढ झाली असून यवत पोलिसांनी रात्रीची गस्त आणि चेक नाका वाढविण्याची गरज आहे.
यवत येथील गणीभाई बशीर सय्यद यांच्या बंगल्याच्या दरवाजाची बाहेरील जाळी फाडून अज्ञात चोरांनी गेटचे लॉक तोडुन बंगल्यात प्रवेश केला व हॉलमधील लाकडी शोकेसमधील कपाटातील ५० हजार किंमतीचा दोन तोळे वजनाचा सोन्याचा गंठण, २५ हजार किंमतीचे अंदाजे अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, साडे बारा हजार किंमतीचे अंदाजे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याची कानातील कर्णफुले, १५ हजार ५०० रोख रक्कम, एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकुण १ लाख ४ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला.
४ ते ५ ऑगस्ट रोजी रात्रीच्या दरम्यान ही घटना घडली, तसेच याच पद्धतीने यवत येथील प्रशांत मलाप्पा कुरन्नवर व धवन कुमार गांधी यांच्याही घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. तसेच नारायण माधवराव जाधव यांच्या घरासमोरील होंडा कंपनीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याबाबत यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.