लोणी काळभोर: महान्यूज लाईव्ह
केदारनाथच्या भागात प्रलय झाला, मोठी आपत्ती झाली. काल रात्र जणू असावी अशी रात्रीच्या वेळी झालेल्या ढगफुटीने प्रचंड मोठी हानी झाली. अनेक घरेच्या घरे नदीत वाहून गेली, मात्र पाण्याच्या लोंढयाबरोबर वाहत आलेल्या मोठ्या दगडामुळे केदारनाथ मंदिर मात्र वाचले आणि केदारनाथावरची श्रद्धा आणखीनच वाढली.. त्या मोठ्या दगडाला आता भीम शिला असे म्हणतात, तसाच काहीसा प्रकार पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोरच्या शिवमंदिरात घडला आहे.
श्रावणात जर महादेवाच्या मंदिरात सापाचे दर्शन झाले, तर भीती पेक्षा श्रद्धाच अधिक निर्माण होते. हा आजवरचा सार्वत्रिक अनुभव! पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथे पांडवकालीन महादेवांच्या पिंडीवर नागराज वेटोळे घालुन बसलेले दृश्य लोणी काळभोरच्या शेकडो शिवभक्तांना याची देही- याची डोळा पाहायला मिळाले.
शुक्रवारी दुपारी लोणी काळभोर येथील या मंदिरामध्ये अचानक एका मूर्तीला विळखा घालून बसलेला नाग आढळून आल. नाग मंदिरात शिरल्याची माहिती मिळताच काही भक्त या ठिकाणी आले, मात्र नागाने फणा काढून दर्शन दिल्यानंतर भीती वाटण्याऐवजी भाविकांना त्याचे अप्रूप वाटले. नेमका श्रावणाचा काळ आणि महादेवाचे मंदिर हा योगायोग नाही, तर भगवान शंकराने काही चमत्कार दाखवला आहे अशी श्रद्धा येथील भाविकांमध्ये निर्माण झाली.
शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास लोणी काळभोर येथील मंदीराचे विश्वस्त सुरेश काळभोर यांना मंदिरात नाग शरीराचे लक्षात आले आणि त्यांनी लागलीच स्थानिक भाविकांना याची माहिती दिली. त्यानंतर शेकडो भाविकांनी येथे गर्दी केली व नागराजांचे दर्शन घेतले.
लोणी काळभोर इथले हे शिवालय पांडवकालीन असल्याचे सांगितले जात असून या मंदिराचा काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला, तसेच या मंदिराची सध्या देखभाल मंदिर समितीने केली जात असल्याने हे मंदिर देखणीय व प्रेक्षणीय झाले आहे. या मंदिरातील शिवलिंग हे पांडवकालीन आह. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या दारात लक्ष्मी नारायणाची त्या काळात कोरलेली मूर्ती असून मंदिरासमोर सतत अग्नी असतो.
याबाबत अधिक माहिती देतांना हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर यांनी गावातील सर्पमित्रांनी नाग पकडून सुरक्षित ठिकाणी सोडल्याचे सांगितले व या घटनेमुळे आमची श्रध्दा आणखी वाढल्याचे मत व्यक्त केले.