सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – इंदापूर तालुक्यातील गोतोंडी येथील आपल्या बहिणीला भेटून करमाळा तालुक्यातील हिवरवाडी गावचा एक युवक त्याच्या मित्रासह मोटरसायकलवर परत जात असताना बुलेट वरून दोघांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करीत त्याला इंदापूर तालुक्यातील पोंदकुलवाडी गावच्या हद्दीत गाठले व त्याच्यावर तलवारीने व कोयत्याने सपासप वार केले. दरम्यान दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या त्याच्या मित्राने तलवारीचा वार चुकवत गाडीवरून उडी मारुन पळून गेल्याने तो बचावला.
फिल्मी स्टाईलने घडलेल्या या थरारात विपुल संतोष इरकर (वय २४ वर्षे, हिवरवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) हा युवक हल्ल्यात जखमी झाला आहे. २८ जुलै रोजी घडलेल्या या घटनेच्या संदर्भात शिवाजी शंकर इवरे व गुरुनाथ शंकर इवरे (रा. गोतोंडी, ता. इंदापूर) या दोघांविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात भा.द. वि. ३०७ अंतर्गत बुधवारी (३ ऑगस्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विपुल संतोष इरकर हा युवक गुरुवारी (४ ऑगस्ट) आपल्या बहिणीला (प्रियांका विठ्ठल इवरे) भेटण्यासाठी गोतोंडी (ता. इंदापूर) येथे आला होता.
बहिणीस भेटून परत जात असताना सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास पोंदकुलवाडी (ता. इंदापूर) हद्दीत आले असता बुलेटवरून पाठलाग करणाऱ्या शिवाजी शंकर इवरे व गुरुनाथ शंकर इवरे या दोघांनी चालत्या गाडीवरून पाठीमागच्या बाजूने विपुल इरकर यांच्यावर तलवारीने वार केला. यावेळी दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या सागर अवघडे (कुगाव, ता. करमाळा) या विपुलच्या मित्राने तलवारीचा वार हुकवत दुचाकीवरून उडी मारून पळ काढला. यावेळी दुचाकीवरील तोल गेल्याने विपुल खाली पडला.
यानंतर दुचाकी सोडून पळ काढणाऱ्या विपुलला आरोपींनी पाठीमागून तलवार फेकून मारल्याने तो कोसळला. तदनंतर तलवार आणि कोयत्याने वार करून विपुलला जखमी करत, दोघा आरोपींनी पुन्हा इंदापूर तालुक्यात दिसला तर जिवे मारू अशी धमकी दिल्याचे विपुल इरकर यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.या हल्ल्यात विपुल इरकर याच्या हातावर व पायावर गंभीर जखम झाली असून त्याला इंदापुर येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
इंदापूर तालुक्यात गुन्हेगारीचे पेव फुटू लागल्याने पोलीस प्रशासनासमोर आव्हान..!
इंदापूर तालुक्यात ग्रामीण भागात गुन्हेगारी व भुरट्या गावगुंडांनी केलेली निर्माण केलेली दहशत हे पोलीस प्रशासनाला आव्हान आहे. ग्रामीण भागातील बरेच गावांमध्ये काही भुरटे गावगुंड अल्पवयीन युवकांना गुन्हेगारी क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे चित्र आहे. अशा चिल्लर भुरट्या गावगुडांना पोलिसांनी खेचून काढावे अशी अपेक्षा सर्वसामान्यांची आहे. इंदापूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर हे इंदापूर पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून बऱ्यापैकी गुन्हेगारी कमी झालेली आहे. त्यांनी अनेक कारवाया केल्याने अनेक अवैध धंदेवाल्यांची दमछाक केल्याचे दिसून आले आहे. अशातच अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळू नये यासाठी भुरट्यांवर कारवाई कराव्यात अशी अपेक्षा आहे.