महान्यूज वेदर अपडेट
मोसमी पावसाने यंदा चांगलेच मनावर घेतले असून अजूनही राज्यात ज्या तालुक्यांमध्ये अद्याप पुरेसा पाऊस नाही, अशा तालुक्यांमध्येही पुढील पाच दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रात येत्या पाच दिवसांत पाऊस मुसळधार असेल असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. या पाच दिवसांत आतापर्यंत जिथे सर्वाधिक पाऊस झाला आहे, अशा ठिकाणीही अतिवृष्टी होण्याची शक्यता असून नद्या दुथडी भरून वाहू शकतात, तसेच नद्या धोक्याची पातळी ओलांडू शकतात असा इशारा दिला आहे.
गेल्या जुलै महिन्यातही जोरदार पाऊस काही तालुक्यांनी अनुभवला आहे. फक्त अजूनही सर्वदूर पाऊस झालेला नाही. मात्र येत्या २४ तासांत व पुढील चार ते पाच दिवस कोकण, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवला आहे.