संदीप मापारी पाटील, बुलडाणा
देशातील वाढत्या महागाई व बेरोजगारीच्या मुद्द्यावरून देशभरात सुरू असलेली कॉंग्रेसची निदर्शने बुलडाणा जिल्ह्यातही सुरू झाली आहेत. शेगावात कॉंग्रेसच्या वतीने रास्ता रोको करून केंद्र सरकारच्या धोरणावर टिका करण्यात आली.
या देशव्यापी आंदोलनात शेगावातील कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. महागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी वाढीविरोधात काँग्रेसने शुक्रवारी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती.
त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी खामगाव-अकोट हा राज्य महामार्ग रोखून धरत केंद्र सरकारचा निषेध केला.
शहर व तालुका काँग्रेस च्या वतीने आयोजित या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र पाटील, कैलास देशमुख शहराध्यक्ष किरण देशमुख, केशव हिंगणे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.