राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड ; दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्यामधील रसायने व रासायनिक पावडरींचे चोरीचे सत्र थांबता थांबेना..! एमक्युआर कंपनीतून तब्बल ३० लाख रुपयांच्या किंमतीचे रसायन पावडर चोरीला गेल्याचे नव्याने समोर आले असून यासंदर्भात दौंड पोलिसांकडे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील एमक्युअर फार्मास्युटीकल या कंपनीत औषध निर्मीती करण्यासाठी आवश्यक रसायनांची पावडर बनवली जाते. यासंदर्भात कंपनीच्या फिर्यादीनुसार कंपनीमध्ये ही पावडर एका शीतगृहात ठेवली जाते व त्यावर देखरेखीसाठी संतोषकुमार पेंटप्पा गुडेली हे सहायक व्यवस्थापकांकडे जबाबदारी आहे. 16 जुलै 2022 रोजी सायंकाळी सहा ते सव्वा सहा दरम्यान गुंडेली हे त्या शीतगृहाच्या चाव्या टेबलवर ठेवून त्यांचे केबीनला लॉक करून कॅबेनची चावी सिक्युरीटी डिर्पाटमेंट येथे जमा करून सुट्टीवर गेले होते.
१८ जुलै रोजी समाधान जगताप हे कामावर आल्यावर त्यांना या शीतगृहाच्या चाव्या सापडल्या नाहीत, त्यामुळे १९ जुलै रोजी नवीन चाव्या बनवून घेतल्या. २२ जुलै रोजी संध्याकाळी सात ते सव्वा सातच्या सुमारास कंपनीत मेलफालान हायड्रोक्लोराईड याच्या दोन बॅचमधील ९१६ ग्रॅम वजनाचे रसायन चोरीला गेल्याची बाब निदर्शनास आली.
हे रसायन गुजरातमधील सानंद येथील एमक्युआर कंपनीच्या निर्मितीस्थळी पाठवायचे होते. ते घेऊन जाण्यासाठी गाडी येणार असल्याने सदरचे मटेरीयल हे चेक करण्यासाठी कंपनीचे कर्मचारी समाधान दत्तात्रय जगताप व सुपरवायजर संदीप नागनथ बारबोले हे शीतगृहाच्या ठिकाणी गेले.
तेव्हा तेथे 16 लाख 8 हजार रुपये किंमतीचे मेलफालान हायड्रोक्लोराईड व ९१६ ग्रॅम वजनाची १३ लाख ९२ हजार रुपयांची पावडर अशी एकूण ३० लाख रुपये किंमतीची रासायनिक पावडर ही अज्ञात चोरटयाने ऑफीस मधील चावीचा वापर करून, शीतगृह उघडून त्यामधील ड्रम मधील पावडरच्या दोन पिशव्या चोरून नेल्याचे समोर आले. याबाबत कंपनीचे राहुल हनुमंत मोरगांवकर यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.