नानाची टांग
एक होता गणपत बेले… आला होता बीडाहून…!
कोवळं पोरगं.. पण घर पुढं न्यायचं होतं त्याच्या मनातून..!
इंदापूरात झाली पहिलीच त्याची नोकरी..
खूपच आनंदी, नशीबवान समजला की, आपण झालो सरकारी..!!
गणपत गरीबीतून आला.. म्हणून गरीबांची त्याला कळवळ..!
रात्री, अपरात्री फोन आला, तरी लाईट लावायची त्याला भारी तळमळ..!
माझा बळीराजा तिष्टत राहू नये म्हणून तो ज्यांच्यासाठी राबला..
गणपत अचानकच कसा खपला..? त्या कोणालाच नाही दिसला..!
गणपत हुशार जसा.. तसाच मनमिळावू…
गरीबीतून आलो सांगत, म्हणायचा डोन्ट वरी लाईट आपण लावू..!
गणपत मोडतच नव्हता त्यांच्यात, जे वायरमन असतील इतर कळलावे, अगाऊ..
झालंच काही, तर म्हणायचा आपलं काम भलं…अन आपण भलं.. भाऊ..!
एके दिवशी काय झालं..?
फोन आला, तसा गणपत उठला.. म्हणाला हा तर माझा नित्यमेन.. तिरतिरीत गाडीवर निघाला… लाईट गेली? म्हणाला नो प्रॉब्लेम..!
वाटलंच नव्हतं त्याच्या आयुष्याचा इथेच तर होणार होता गेम..!
गणपतला करंट बसला..! करंट बसला..! कळलंच नाही..!
जो तो लागला सांगू, घडलं काय, माहितीच नाही..!
गरीबाचं पोर हकनाक मेलं… कशामुळं? माहितीच नाही.. माहितीच नाही..!
गणपत बेले गेले…! दहा दिवस झाले… कशामुळे? अजूनही नाही कळले..!!
म्हणे तपास सुरू आहे… तारीख पे तारीख इथेही सुरू आहे..!
तिकडे बटण दाबले की, लख्ख प्रकाश पडतो,
त्या खात्यातही गणपतचा आत्मा न्यायाशिवाय सडतो..!
सिस्टीम सडकी असते, माहिती होतं.. पण एवढी?
बरोबर काम केलेल्यांचीही राजकारणापुढे किंमत नसते?
अरे, जीव त्याचा गेला, तुम्हाला त्याची काहीच कशी नाही किंमत?
साहेब कशाला झाले तुम्ही, तुमच्यात नव्हती एवढी हिंमत..!!
गणपत तुला माहिती नाही, तू काम कोठे करीत होता…
इथेच मेली एक पोरगी.. आणि एकजण जो निष्पाप होता..!!
तोच हा भाग आहे…माणसेही तशीच आहेत..!!
गणपत तु आता मेलास, त्यांचे तर आत्मे अजूनही तसेच फिरत आहेत..!!
पैसे दिले की, भलाभला अधिकारीही झक मारत मान वाकवतो..
बघायचंय तुझ्या प्रकरणात, कोणाचा किती गल्ला भरतो..!!
कोणी कितीही झाकलं तरी अंधारात झालेला सौदाही बाहेर पडतो..!
लाज कशी वाटत नाही, तपास सुरू आहे असं जो जो सांगतो..!
वर्षश्राध्दापूर्वी तरी तुला न्याय मिळावा, मी काय म्हणतो..?
लाईटची तार पडली, पीक जळालं..तो बळीराजा तिष्ठत राहतो..
वर्षानुवर्षे नुकसानभरपाई अभावी..
त्याच खात्याचे तुझे भाऊबंद, त्यांना तुझी तरी कणव का यावी..?
मुर्दाडांच्या दुनियेत वाटतंय, तू जसा प्रामाणिक होता..
एक दिवस असा यावा, पेटून उठावे रान सारे, अन पुढे यावा न्यायदाता..!
माणसांचे जीव सुध्दा राजकारणापुढे छोटे झाले.. गणपत बेले हकनाक गेले.. गणपत बेले हकनाकच मेले..!