शिरूर : महान्यूज लाईव्ह
सांगली जिल्ह्यात काम करताना अल्पवयीन मुलीच्या तपासात उल्लेखनीय काम केलेल्या करडे (ता.शिरूर) येथील रणरागिणीचा नुकताच सर्वोत्कृष्ट अपराधसिद्ध पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अत्याचार केला होता. शिराळा पोलीस ठाण्याच्या तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे (झिंजुर्के) यांनी आरोपीस तात्काळ अटक करून कौशल्यपूर्ण तपास केला.
त्यानंतर थोड्याच दिवसांत इस्लामपूर सत्र न्यायालयाने आरोपीस २० वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावून पिडीत कुटुंबास न्याय दिला. या कौशल्यपूर्ण तपासाच्या कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पोलीस पोलीस महासंचालक यांच्या वतीने सोमवारी पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे (झिंजुर्के) यांना राज्यातील सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पोलीस पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
त्यांच्या या कामगिरीबद्दल करडे येथील ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिरूर तालुक्यातील कर्डे हे पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया झिंझुर्के यांचे मूळ गाव. सन २०१६ मध्ये पोलीस दलात भरती झालेल्या सुप्रिया यांनी नाशिक येथे प्रशिक्षण घेऊन सांगली जिल्ह्यात विटा व जत पोलीस ठाण्यात सेवा बजावली.
त्यानंतर त्यांची सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे बदली झाली. याठिकाणी त्यांनी कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केली. अवघ्या दोन वर्षांच्या स्वतःच्या चिमुकलीला घरी ठेऊन त्यांनी रस्त्यावर उतरत कोरोनाविरूध्दची लढाई लढली. एक संवेदनशील अधिकारी म्हणून त्यावेळी त्यांचे खूप कौतुक झाले.
शिराळा येथे सेवेत असताना एका १३ वर्षीय लहान मुलीवर गावातील एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला होता. शिराळा पोलीस ठाण्याच्या तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे (झिंजुर्के) यांनी आरोपीस तात्काळ अटक करून कौशल्यपूर्ण तपास केला.
त्यांच्या या कार्याची दखल घेत सीआयडीचे राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रितेश कुमार यांच्या हस्ते राज्यातील सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पोलीस पुरस्काराने गौरविण्यात आले. करडे गावातील विनायक झिंझुर्के हे सुप्रिया यांचे पतीही पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. सध्या दोघेही उपनिरीक्षक पतीपत्नी सासवड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तेथे ही त्यांनी आपल्या कामाने एक वेगळा ठसा उमटविला आहे.