अनिल गवळी : महान्यूज लाईव्ह
विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 8 वी ते 12 वी च्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 8 वी ते 12 वी च्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न झाला. ॲड प्रभाकर शेवाळे, ॲड.अनिल तांबे, ॲड. मधुसूदन मगर, पांडुरंग भापकर तसेच विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब शिवरकर, सचिव चंद्रकांत ससाणे यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. शेवाळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आजचे पाहुणे म्हणजे आपले दीपस्तंभ आहेत असे सांगितले. जिद्द आणि कष्ट याच्या साथीने जशी यांनी उंच भरारी घेतली, यशस्वी झाले, तसे आपणही कष्ट करण्याची ताकत आणि यशस्वी होण्याची जिद्द अंगिकारली पाहिजे. मोठे होण्यासाठी खूप पुस्तके वाचा, अवांतर वाचन करा, कारण ते तुमच्या जीवनाला एक दिशा देईल, असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲड. मधुसूदन मगर यांनी कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करू शकता असे सांगितले. आज शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत, ते समजून घ्या. शिवरकर साहेबांचे एकच स्वप्न आहे की, सर्वसामान्यांची मुले शिकावी, त्यासाठी ते नेहमी कार्यरत असतात,आपलेही हे कर्तव्य आहे की आपणही शिकून मोठे व्हावे असे मत व्यक्त केले.
ॲड. पांडुरंग भापकर म्हणाले की, शिवरकर यांनी मी व माझ्याबरोबर अनेक कुटुंबाना उपकृत केले आहे आणि आज या आपल्या शाळेतील मुलांना उपकृत करण्याचा योग मला मिळाला. कोणत्याही करिअरला शॉर्टकट नाही, कष्टाला पर्याय नाही. आई वडिलांचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. त्यांचे कष्ट, माया, प्रेम, विसरू नका. आपल्या पाठीशी सदैव त्यांचे आशीर्वाद असतात. ज्ञान हे यशाकडे घेऊन जाणारे धारधार हत्यार आहे, त्याचा योग्य उपयोग करा आणि इंटरनेटच्या माध्यमातून सगळं जग जणू आपल्या मुठीत आले आहे, त्याचा वापर करा, पण जे चांगले आहे त्याचा स्वीकार करा.
ॲड. अनिल तांबे यांनी जीवनात शिक्षण हे महत्वाचे आहे, शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्यासाठी फक्त शिकू नका तर व्यावसायिक बना व नोकरी देणारे व्हा अशी अपेक्षा व्यक्त केली.
डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज चे ट्रस्टी जयसिंह पाटील यांनी विद्यालयात मेडिकल कॅम्प घेण्याचा मानस असल्याचे सांगितले. यावेळी विद्यालयातील 525 विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.
सन्मित्र बँकेचे चेअरमन सुनील गायकवाड, सुहास आदमाने, माजी नगरसेविका कविता शिवरकर, माया ससाणे, ससाणेनगरच्या माजी ग्रामपंचायत सदस्या पुष्पा गायकवाड,प्रा. सुलतान खान, सोपानराव गवळी, पुंडलिक गवळी, सुर्यकांत देडगे, यशवंत झगडे, रमेश काकडे, ॲड.विजय राऊत, वैभव डांगमाळी, विजय कोद्रे, महेंद्र तिडके, सचिन गिरमे, श्री. ताजने, शंभूशेठ जांभूळकर, उदय लोणकर, बापूसाहेब मोरे, दशरथ जाधव, प्राचार्य लहू वाघुले, ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य लहू वाघुले यांनी केले. सूत्रसंचालन श्रद्धा ससाणे यांनी व आभार माजी नगरसेवक अभिजीत शिवरकर यांनी मानले.