किशोर भोईटे, महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील पिंपळी येथील शेतकरी कुटुंबातील मुलगी ऋतुंबरा रमेश देवकाते ही आता विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेणार आहे. व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षणासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत ऋतुंबराने राज्यात दहाव्या क्रमांकाचे यश मिळवले आहे.
ऋतुंबरा हिने बारावीनंतर नागपूर येथील व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षणासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाजोती ) यांच्यामार्फत प्रशिक्षणासाठी अर्ज केला होता. त्यामध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेतुन तिची निवड करण्यात आल्याने परिसरातून तिचे कौतुक होत आहे.
ऋतुंबरा हिच्याप्रमाणेच ग्रामीण भागातील मुलीही या प्रवेश परीक्षेत भाग घेऊ शकतात. तो एक मार्ग आता ग्रामीण भागात मुलींसाठी उपयुक्त ठरणार आहे. ऋतुंबराचे शेतकरी कृती समिती भवानीनगरच्या सदस्यांनी अभिनंदन केले.