किशोर भोईटे,महान्यूज लाईव्ह
निवृत्त कामगारांच्या विविध मागण्यांसाठी 9 ऑगस्ट क्रांतीदिनी दिल्लीमध्ये 2 लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे रामलीला मैदानावर सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी बारामती, इंदापूर व दौंड तालुक्यातून 100 तर पुणे जिल्ह्यातून 1000 सेवानिवृत्त कर्मचारी रेल्वेने दिल्लीला जाणार असललेचे ई.पी.एस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे इंदापूर तालुका अध्यक्ष प्रकाश शिंदे यांनी सांगितले.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाने ई.पी.एस 95 ही अन्यायकारक पेन्शन योजना लागू केली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे 7 लाख कोटी रुपये पेन्शन खात्यामध्ये जमा असतांना त्यांना 500 रुपये महिना तुटपुंज्या सेवानिवृत्ती वेतनावर दिवस काढावे लागत आहेत.
देशातील निवृत्त कर्मचाऱ्यांनी या विरोधात राष्ट्रीय संघर्ष समिती स्थापन केली असून केंद्र सरकारच्या विरोधात ठिकठिकाणी अंदोलने, मोर्चे काढले जात आहेत. 67 लाख औद्योगिक, सार्वजनिक, सहकारी व इतर उद्योगधंद्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवाकाळात ई.पी.एस 95 पेन्शन फंडांमध्ये अंशदान दिले असून त्यांना सेवानिवृत्तीनंतर त्यावर अत्यंत तुटपुंजी पेन्शन मिळत आहे.
काहींचा घरखर्च तर सोडाच, परंतु औषधपाणी देखील भागणे अवघड आहे. त्यांची दयनीय अवस्था निर्माण झालेली आहे. या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन वाढीसाठी राष्ट्रीय संघर्ष समिती गेली 6 वर्षांपासून संघर्ष करीत असून वृद्ध पेन्शनर हितचिंतक खासदार हेमा मालिनी यांच्या समवेत प्रधानमंत्री व राष्ट्रीय संघर्ष समिती राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत, संघर्ष समितीचे सदस्य यांच्यामध्ये पेन्शन वाढीबाबत बैठक होऊन समितीने पेन्शन वाढ कशी योग्य आहे हे प्रधानमंत्री यांना पटवून दिले.
पंतप्रधानांनी देखील पेन्शन वाढीचे संबंधित मंत्र्यांना निर्देश दिले होते. वित्त सचिव टी. सोमनाथन व समिती सदस्यांमध्ये बैठक होऊन त्यांनी पेन्शन वाढ देण्यास हरकत नसून लवकरच कार्यवाही करीत असल्याचे सांगितले. मात्र दिड वर्ष उलटून गेले तरीदेखील अजूनही पेन्शनमध्ये वाढ किंवा कसलाही आदेश निघालेला नाही.
यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी संभ्रमावस्थेत असून त्यांचा आता संयम सुटत चाललेला आहे . त्यामुळे त्वरित रुपये 7500/- + महागाई भत्ता इतकी कमीत कमी पेन्शन वाढीची घोषणा करणेत यावी यासाठी संसदेत बजेटमध्ये तरतूद करावी व संसदेत बिल पास करण्यात यावे.
या बरोबरच वृद्ध सेवानिवृत्त कर्मचारी तसेच त्यांच्या पती-पत्नीला मोफत मेडिकल सुविधा पुरविण्यात याव्यात या मागण्या मान्य करण्यासाठी 9 ऑगस्ट क्रांतीदिनी दिल्लीमध्ये 2 लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे रामलीला मैदानावर सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे.
यासाठी बारामती, इंदापूर व दौंड तालुक्यातून 100 तर पुणे जिल्ह्यातून 1000 सेवानिवृत्त कर्मचारी रेल्वेने दिल्लीला जाणार असललेचे ई.पी.एस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे इंदापूर तालुका अध्यक्ष प्रकाश शिंदे यांनी सांगितले.