वर्धा महान्यूज लाईव्ह
आज वर्धा जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मात्र यावेळी हिंदीत अगोदर बोला असे सांगणाऱ्या चॅनेलच्या पत्रकाराला दादांनी खडसावले. अगोदर मराठी वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांनाच त्यांनी माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका पत्रकाराने मराठीत पत्रकार परिषद घ्यायची, तर ती मुंबईत घ्यायची, इथे कशाला? असा प्रश्न विचारला होता.
आज पत्रकार परीषद सुरू झाल्यानंतर अगोदर अजित पवार यांनी सर्व घडामोडी स्पष्ट केल्या. त्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारण्यास सुरवात केली. त्यात मध्येच हिंदीतून बाईट मागणाऱ्या पत्रकाराला अजित पवार यांनी अगोदर मराठीचे होऊ द्या असे अगोदर सांगितले. दोन -तीन प्रश्न होताच पुन्हा हिंदी भाषिक वाहिनीच्या बातमीदाराने हिंदीचा आग्रह धरला.
मग मात्र अजितदादा चिडले. त्यांनी मराठी आमची मातृभाषा आहे. अगोदर मराठीचे होऊ द्या. मग हिंदीचे बघू असे म्हणत त्या बातमीदाराला स्पष्टपणे फटकारले. सर्व पत्रकारांचे प्रश्न संपल्यानंतरच दादांनी मग हिंदीतून उत्तरे दिली..