संदीप मापारी पाटील, बुलढाणा
लोणार : नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी २३ जुलै रोजी लोणार सरोवराच्या परिसराची पहाणी करून लोणार विकास आराखड्याची सविस्तर माहिती घेतली. सरोवर संवर्धनाकरिता प्राथमिक स्तरावर आवश्यक कामे नागपूर खंडपीठाने सुचवली होती. त्याची यामध्ये प्रामुख्याने पाहणी करण्यात आली.
शासन स्तरावरून नागपूर खंडपीठाने सुचविल्यानुसार विकासकामांवर आधारित एक सर्वकष विकास आराखडा तयार करण्यात आला होता. त्यामध्ये प्रस्तावित कामे ही अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू होती. ती वेळेत पूर्ण होण्यासाठी खंडपीठाच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या विकासकामांच्या प्रगतीचा अहवाल पाहिजे तसा मिळत नव्हता. त्या अनुषंगाने या कामांचा आढावा २३ जुलै रोजी घेण्यात आला.
न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी समितीमार्फत सर्वप्रथम वन्यजीव विभागाकडून सरोवर परिसरातील काढण्यात येणाऱ्या वेड्या बाभळीसंदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेतली. याचे उर्वरित कामही त्वरेने मार्गी लावण्याच्या सूचनाही वन्यजीव विभागाला त्यांनी दिल्या. खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार याची कामे केली जाणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सी . एम . राठोड यांनी दिली.
दरम्यान, अभयारण्यातून जाणाऱ्या मंठा – लोणार , सरस्वती लोणार या – रस्त्याच्या बायपासच्या कामाचा आढावा घेऊन त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या दुर्लक्षित अन्नछत्राची पाहणी केली. यावेळी परिसरातील अतिक्रमणाबाबत पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना त्यांनी काही सूचनाही दिल्या. धारातीर्थावरील पुरातत्त्व विभागाने बांधलेल्या स्वच्छतागृहाच्या कामांचा आढावा घेत न्यायमूर्ती सानप यांनी नगरपालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी केली.
त्यानंतर त्यांनी लोणार सरोवर विकास आराखड्याच्या अनुषंगाने कामे होत आहे की नाहीत, याचाही सर्व विभागांकडून सविस्तर आढावा घेतला. काही कामांवर त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचीही माहिती आहे. न्यायमूर्ती जी . ए . सानप यांच्या लोणार सरोवर विकास आराखड्यासंदर्भातील आढावा बैठकीस विभागीय आयुक्त डॉ . दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी एस . राममूर्ती, एसडीओ गणेश राठोड, वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक मनोज खैरनार, सी. एन. राठोड यांच्यासह अन्य उपस्थित होते.