घनशाम केळकर महान्यूज लाईव्ह
भोर – तालुक्यातील वर्वेच्या पाझर तलावात पोहताना तलाठ्याचा बुडून मृत्यू झाला. अत्यंत तरबेज, ट्रेकींगसाठी उत्साही असणाऱ्या मुकुंद चिरके यांच्या अशा अपघाती मृत्यूने भोरच्या महसूल विभागासह आसपासच्या गावातही अनेक जण शोकाकुल झाले होते.
भोर तहसीलच्या महसूल विभागात कारकून असलेले कामगार तलाठी मुकूंद चिरके यांचा वर्वे येथील पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. पोहण्यात पटाईत असतानाही त्यांना दम का लागला असावा अशी शंका अनेकांना आला, तेव्हा ते पावसात भिजल्याने दोन दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना सर्दीचा त्रास होता, त्यामुळे त्यांना दम लागला असावा अशी शंका स्थानिकांनी उपस्थित केली आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मुकूंद चिरके हे पोहत असताना त्यांना मध्यभागी गेल्यानंतर दम लागला. त्यांनी मित्रांना मदतीसाठी हाका मारल्या. त्यामुळे मित्रांनी किनाऱ्यावरची नाव वल्हवत नेण्यास सुरवात केली. मात्र तोपर्यंत चिरके पाण्यात बुडाले होते. त्यांच्या मित्रांनी व स्थानिकांनी त्यांना वाचवण्यासाठी धडपड केली. मात्र खोल पाण्यात तलाठ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शोध मोहिमेनंतर मृतदेह मिळाला.
मुकुंद त्रिंबकराव चिरके हे नसरापूर येथे राहत होते. ते मूळचे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील जहागिरमोहा या गावचे रहिवासी होते. ही घटना सोमवारी ( दि. २५ ) रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वरवे खुर्द ( ता. भोर ) येथील लघु पाटबंधारेच्या तलावात ही घटना घडली. भोईजल संघ भोरच्या पथकाने यासाठी बराच वेळ शोधमोहीम राबवली. त्यानंतर पाच तासानंतर चिरके यांचा मृतदेह हाती लागला.
घटनेनंतर प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, मंडलधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली, विद्या गायकवाड, महसूल कर्मचारी, फौजदार श्रीकांत जोशी, सहायक फौजदार उमेश जगताप, वर्वेचे सरपंच निलेश भोरडे, ग्रामसेविका शाहीन इनामदार आदींनी तेथे पोचून मदतकार्याचा आढावा घेतला.