महान्यूज वेदर अपडेट
राज्यात आज म्हणजे २३ जुलैपासून पुन्हा मान्सून सक्रीय होतोय. पुढील चार ते पाच दिवस मुसळधार व अतिवृष्टीचे दिवस असल्याचा अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान कोकणात सर्वात जास्त पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे.
१ जुलैपासून १८ जुलैपर्यंत राज्यात पाऊस सक्रीय झाला, अर्थात तरीदेखील राज्याच्या काही तालुक्यांमध्ये याही काळात पाऊस पडलेला नाही. त्यामुळे एकीकडे दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, ओढे, नाले हे चित्र तर दुसरीकडे पाऊस नसल्याने खरीपाच्या पेरण्यांना ओढ बसल्याचे चित्रही राज्यात पाहायला मिळते आहे.
आता हवामान खात्याने पुन्हा एकदा पाच दिवसांचा अलर्ट जारी केला आहे. मध्यम ते जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला असून रविवारी राज्यात सर्वाधिक पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.