पुणे : महान्यूज लाईव्ह
एकीकडे महाविद्यालयाच्या, शाळेच्या आवारात किमान १०० मीटर अंतरावर कोठेही तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवू नयेत असा दंडक असताना एका हॉटेलचालकाने थेट विद्यार्थ्यांनाच दारू पिण्याची ऑफर दिली आहे. हा धाडसी हॉटेलचालक अर्थातच पुण्यनगरीनजिकचा आहे.
जिल्ह्यातील लोणीकाळभोर येथील एका हॉटेल व्यवसायिकाने विद्यार्थ्यांसाठी दारु पिण्याची ऑफर काढली आणि तिची जाहीरात थेट महाविद्यालयाच्या गेटवर केली. लोणीकाळभोर पोलिसांनी गांभिर्याने दखल घेत या व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला आहे.
लोणीकाळभोर येथील द टिप्सी टेल्स हॉटेल या हॉटेलचा मालक देवीप्रसाद सुभाष शेट्टी याने हॉटेलचा व्यवसाय वाढविण्यासाठी एक जाहीर केली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दोन तासांसाठी ७९९ रुपयांत अमर्यादीत दारु मिळेल अशी जाहीरात केली.
ही जाहीरात प्रसिध्द केल्यानंतर विद्यार्थ्यांना खुलेआम दारू विकत असल्याने स्थानिकांनी त्याला विरोध केला, तर स्थानिक गुंडांना हाताशी धरून शेट्टी याने या स्थानिक नागरिकांचा बंदोबस्त
केला. मग मात्र नागरिक चिडले.
शेवटी पोलिसांनीही यात गांभिर्याने दखल घेतली. पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हॉटेलमध्ये जाऊन शेट्टी याच्याविरोधात चौकशी करून गुन्हा दाखल केला. पोलिस ठाण्याचे प्रदीप क्षीरसागर यांनीच स्वतः फिर्याद दाखल केली.