महाबळेश्वर : महान्यूज लाईव्ह
भलेही कोणतेही सरकार सत्तेवर आले की, मोठमोठ्या घोषणा करतात.. कोणी म्हणते, सबका विकास सबका साथ! कोणी म्हणते, आपले सरकार… मात्र प्रत्यक्षात, वस्तुस्थिती अशी झाली आहे की, माझे गाव, मग माझ्यावरच जबाबदारी! अशीच गावकऱ्यांची स्थिती आहे. निदान हा व्हिडीओ पाहिल्यावर त्याचीच प्रचिती येईल.
सततच्या पावसामुळे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील गावांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. आता तर मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठीही ओढे आडवे आल्याने अखेर जेसीबीचा आधार घेण्याची वेळ आली आहे आणि हे चित्र काही ब्राझील किंवा गरीब देशांमधील नाही, तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दाभे मोहन या गावातील आहे.
सध्या या गावातील एक व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. गावातील मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह झोळीत घेऊन जावा लागला आणि दुसरीकडे रस्त्यातच ओढ्याचे पाणी असल्याने अखेर जेसीबी बोलवावा लागला. ओढ्याचे पाणी प्रचंड वेगाने वाहत असल्याने त्यावर एक ओंडका टाकून शेजारी जेसीबी उभा करून त्यावरून मृतदेह पलीकडे नेण्यात आला. हा व्हिडीओ फक्त व्हायरल झाला नाही, तर प्रशासनाच्या उदासिनतेची लक्तरे महाराष्ट्राच्या वेशीवर टांगणारा ठरला आहे.
अर्थात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात पडत असलेल्या तुफान पावसामुळे अनेक गावे संपर्कहीन झाली आहेत. वाटेत आडव्या येणाऱ्या ओढ्यांमुळे कोठे रस्ते वाहून जातात, तर कोठे रस्तेच नसल्याने ओंडक्यांचा आधार घ्यावा लागतो, मात्र प्रशासनाला त्याचे काहीच देणेघेणे नाही.
सरकारी कार्यालयांमध्ये कोठे पडतो पाऊस? कार्यालये तर टुमदार असतात. ती कोठे गळतात? सरकारी अधिकाऱ्यांची निवासस्थाने तर चांगल्या ठिकाणी असतात. नुकसानीच्या भागात नसतात. मग त्यांना कोठून कळणार नुकसानीच्या झळा? पण सातारा जिल्ह्यातील नद्यांच्या खोऱ्यातील अनेक गावे अशी आहेत, जिथे आपत्तीला बरोबर घेऊनच लोक दररोजचे जीवन जगतात.
ती कधीच कुडत नाहीत की राग व्यक्त करीत नाहीत, म्हणून मग त्यांच्याकडे लक्षही जात नाही. पण दाभे मोहन गावातील या घटनेनंतर तरी प्रशासन जागे व्हावे आणि त्यांच्यातील माणूस जागा व्हावा एवढीच अपेक्षा.