विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. इथं कुणी पालकमंत्री झाला, कुणी मंत्री झाला, कुणी संत्री झाला, तरी काही फरक पडत नाही अशी टीका आमदार सुनील शेळके यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादा युथ फाउंडेशनच्या वतीने बारामती येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री होणार अशी चर्चा आहे असा प्रश्न विचारल्यानंतर आमदार सुनिल शेळके यांनी वरील टिका केली.
ते म्हणाले की, पुणे जिल्हा हा पवारांचा जिल्हा आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला देखील माहीत आहे. पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पवारांचं असलेलं योगदान हे कुणी कदापि विसरू शकत नाही. त्यामुळे इथं कुणी पालकमंत्री झाला, कुणी मंत्री झाला, कुणी संत्री झाला, तरी काही फरक पडत नाही.
अनेक वर्षापासून पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी राजकीय ताकद आहे. सध्या सत्तेत असलेल्या शिदे-फडणवीस सरकारमध्ये पुण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार अशी चर्चा आहे. पुणे जिल्ह्यात आगामी काळात पुणे – पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे जिल्हा परिषद, जिल्ह्यातील साखर कारखाने आदींच्या निवडणुका आहेत.