मुंबई महान्यूज लाईव्ह
राज्यात दररोज काहीतरी राजकीय नव्या घडामोडी घडत असतानाच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकाच दिवसात राज्यासह देशभरातील सर्व कार्यकारीण्या, त्यांचे वेगवेगळे सेल आणि विभाग एका क्षणात बरखास्त केले आहेत.
आता या जागांसाठी फ्रेश कार्यकर्त्यांची वर्णी लागणार की, नव्या काही घडामोडी घडणार याची उत्सुकता राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लागून राहीली आहे. राष्ट्रवादी नव्याने कात टाकून नव्या तरुणाईला सामावून घेण्याच्या स्थितीत आहे, की, काहीतरी घडणार याची कुणकुण लागल्याने सारे बदलण्याच्या स्थितीत आहे हे येत्या काही दिवसांतच कळेल.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धक्कातंत्र अवलंबून सगळे विभाग बरखास्त केले आहेत. महासचिव प्रफुल्ल पटेल यांनी यासंदर्भात एक पत्रक प्रसिध्दीस दिले असून आता क्षणापासून राष्ट्रवादीतील सर्व सेल आणि विभाग बरखास्त करीत असल्याचे पटेल यांनी सूचित केले आहे.
या बरखास्तीचा राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीशी काही संबंध आहे की, राज्यात नव्याने कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी हा वेगळा फंडा आहे हे येत्या काही दिवसांतच कळून येईल. मात्र स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर हा वेगळा प्रयोगही राष्ट्रवादीत चैतन्य आणणारा ठरेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे.