बारामती : महान्यूज लाईव्ह
मुंबईच्या मालाडमध्ये ३८ वर्षाच्या तरुणाने लोन एजंटाने व्हाटसअपवरून मॉर्फ केलेले नग्न फोटो व्हायरल केल्याने आत्महत्या केली. दुसरीकडे लोन अॅप बॅन करण्याची मागणी महाराष्ट्र पोलिसांनी व केंद्र सरकारनेही गुगलकडे केल्यानंतरही लॉन अॅपच्या रॅकेटचा धुमाकूळ सुरूच आहे. पुणे जिल्ह्यातही हे प्रकार सुरूच असून कालपर्यंत बारामतीतही असा अनुभव आला आहे.
मालाडमधील संदीप कोरेगावकर या तरुणाने आपले मॉर्फ केलेले फोटो आपल्या मित्रांना व्हाटसअपवरून व्हायरल केल्याने निराश होऊन त्यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिस उपायुक्त सोमनाथ घागरे यांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान बारामतीत मागील चार महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून एका महिलेचीही अशाच पध्दतीने बदनामी सुरू आहे. विशेष म्हणजे संदीप कोरेगावकर याने तरी लोन घेतले होते. मात्र बारामतीतील महिलेने तर कसलेच कर्ज कोणत्याही अॅपमधून घेतलेले नाही. फक्त एक लिंक व्हाटसअपवर आली, ती ओपन करताच तिचा मोबाईल हॅक करण्यात आला आहे.
ही महिला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते, तिने या घटनेनंतर लागलीच पोलिसांकडे धाव घेतली. प्रथम सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल केला व नंतर बारामती शहर पोलिसांनीही दखल घेतली. काही दिवस हा प्रकार थाबल्यानंतर आता पुन्हा हा प्रकार सुरू झाल्याचे या महिलेचे म्हणणे आहे.
आता तर कोणाचीही छायाचित्रे मॉर्फ करून महिलेच्या चेहऱ्याच्या फोटोशी जुळवून व्हायरल केली जात आहेत. अशी अश्लील प्रकारची छायाचित्रे व्हायरल केली जात असल्याने प्रकरण गंभीर बनले आहे. पोलिसांनी युध्दपातळीवर व अधिक गांभिर्याने यात लक्ष घातले नाही, तर मालाडसारखा प्रकार बारामतीतही घडू शकतो असा इशारा महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.