शिरूर (महान्यूज लाईव्ह) : शिरूर लोकसभा मतदार संघ सध्या भलताच चर्चेत असून शिरूर लोकसभा मतदार संघात वादळापूर्वीची शांतता असल्याचे बोलले जात आहे.
शिरूर लोकसभा मतदार संघात काही दिवसापूर्वी शिरूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची काही दिवसांपूर्वी शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर तातडीने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून आढळराव पाटील यांची केलेली हकालपट्टी मागे घेण्यात आली.
याबाबत अनवधानाने ते वृत्त आल्याचे सांगत सारवासारव देखील केली होती. या घटनेने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील कमालीचे व्यथित झाले होते. दरम्यान पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे मातब्बर नेते विजय शिवतारे हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याने त्यांची शिवसेनेतून नुकतीच हकालपट्टी करण्यात आली आहे.
शिरूर लोकसभा मतदार संघात सातत्याने राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. राष्ट्रवादी कडून सातत्याने अन्याय होत असल्याची भावना नेहमी व्यक्त केली जात होती. ही खदखद शिवसेनेत पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे व्यक्त केली होती.
राज्यात होत असलेल्या घडामोडी व बदलेली समीकरणे यामुळे शिरूर लोकसभा मतदार संघात ही हालचाली सुरू असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंगळवार (दि.१९) रोजी सर्व पदाधिकारी यांची तातडीची बैठक बोलावली असून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नेमकी काय भूमिका आहे हे स्पष्ट होणार आहे.
शिरूर लोकसभा मतदार संघात सुरू झालेल्या हालचाली वादळापूर्वी च्या शांतता असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत लवकरच नेमके काय ते कळेलच…