राजेंद्र झेंडे : महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील मलठण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा (क्रमांक १) निलंबित वर्ग शिक्षक निलेश शिर्के व त्याच्या कुटुंबीयांनी दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांना दरवाजाजवळ अडवून निलंबिन मागे घेण्यासाठी दबाव आणला तसेच येळे यांच्या कार्यालयात जाऊन शिविगाळ केल्याची घटना घडली.
याप्रकरणी तिघांवर दौंड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती दौंड पोलीसांनी दिली. निलेश मोहन शिर्के, मोनिका निलेश शिर्के व मोहन विश्वनाथ शिर्के ( रा.हिंगणीबेडी ता दौंड जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की,
दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे हे सोमवारी ( दि १८) सकाळी ११ वाजता पंचायत समिती कार्यालयात जात असताना कार्यालयाचे गेटच्या दरवाज्यासमोर असताना कार्यालयासमोर उभा असलेला निलंबीत शिक्षक निलेश मोहन शिर्के, त्याची पत्नी मोनिका निलेश शिर्के, त्याचे वडील मोहन विश्वनाथ शिर्के यांनी तुम्ही गटविकास अधिकारी आहात, तुम्ही माझे निलंबन कॅन्सल करा असे म्हणुन मला ऑफिसमध्ये जाण्यास मज्जाव केला.
कार्यालयाच्या गेटचे दरवाज्यासमोर अडवून ठेवले. त्यावेळी कार्यालयातील उपअभियंता नवनाथ नारायण फुलारी, बालविकास प्रकल्प अधिकारी कुणाल सुभाषराव धुमाळ, शाखा अभियंता जितेंद्र बलभिम शिंदे ,परीचर माणिक आप्पा भागवत, अंकुश जगताप हे गोंधळ आल्याने दरवाजा जवळ आले.
त्यांनी मध्यस्थी करत येळे यांना त्यांच्या ऑफिस मध्ये नेले. येळे हे ऑफिस मध्ये दैनदिन काम करीत असताना पुन्हा हे तिघे गटविकास अधिकारी येळे यांच्या ऑफिसमध्ये आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ, बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे, मलिका इंगळे, विस्तार अधिकारी स्नेहल माकर, बाबा रहीमान मुलाणी हे केबिनमध्ये कामकाज करीत होते.
यावेळी हे तिघे ऑफिस मध्ये घुसुन निलंबित शिक्षक निलेश शिर्के यांनी येळे यांना तुम्ही एक भ्रष्ट अधिकारी आहे. तुम्ही माझे निलंबन रद्द का करत नाही ? माझी दौंड तालुक्यात बदली का करत नाही? असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच टेबलवर ठेवलेले कागदपत्र अस्ताव्यस्त करून सरकारी कामामध्ये अडथळा आणला.
याप्रकरणी दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांनी दौंड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने या तिघांवर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश आबनावे हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.