एकनाथ शिंदेच्या आडून भाजप आता राष्ट्रवादीच्या शक्तीस्थळांवर घाव घालण्याच्या तयारीत, पुन्हा साखर कारखान्यांवर नेम…! विरोधकांना देणार बळ..!

मुंबई : महान्यूज लाईव्ह

राज्यात शिवसेना जराजर्जर व कॉंग्रेस लढाईच्या मानसिकतेत नसल्याच्या अविर्भावात आता केवळ समोर राष्ट्रवादी कॉंग्रेस एवढेच लक्ष्य असल्याचे भाजप नेते मानत आहेत. त्यामुळेच आता राज्यातील राष्ट्रवादीच्या अधिपत्याखालील साखर कारखान्यांच्या जिथे निवडणूका होणार आहेत, तिथे भाजपकडून स्थानिक विरोधकांना पाठबळ दिले जाणार आहे, यासंदर्भातील छुप्या घडामोडी सध्या सुरू आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने नेमकी कोणाकोणाला ताकद अधिक पुरवली याचा लेखाजोखा घेतला जात असून सध्या राज्यपातळीवरील सरकारी निधीचा फेरविचार केला जात आहे. मात्र येणाऱ्या काही दिवसांतच जिथे जिथे सहकारी चळवळीत काही तक्रारी स्थानिक स्तरावरून केल्या जातील, त्यांना अधिक गांभिर्याने घेऊन या तक्रारींच्या चौकशीसाठी अधिकाऱ्यांची फौज उभारण्याचेही संकेत मिळत आहेत. ज्यातून सहकारी साखर कारखानदारीवरील राष्ट्रवादीची पकड ढिल्ली करण्याचे आटोकाट प्रयत्न केले जाणार आहेत.

पुणे जिल्ह्यातही आगामी काळात छत्रपती साखर कारखाना, रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याच्या निवडणूका प्रस्तावित आहेत. या दोन्ही कारखान्यांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. छत्रपती कारखाना खुद्द विरोधी पक्षनेते अजित पवार व माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या अधिपत्याखाली तर घोडगंगा साखर कारखाना आमदार अॅड अशोक पवार यांच्या अधिपत्याखाली आहे. या दोन्ही कारखान्यांच्या निवडणूका तोंडावर आहेत.

या दोन्ही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील राष्ट्रवादी विरोधकांची मोट बांधून त्यांना पाठबळ देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यातील झालेल्या सत्तांतराचा फायदा यातून स्थानिक विरोधकांनाही होणार असल्याने असे पाठबळ मिळाल्यास तेही नाकारण्याची शक्यताच नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यातील इतरही जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या निवडणूकांमध्ये भाजप नेत्यांकडून स्थानिक विरोधकांना पाठबळ पुरवले जाण्याची शक्यता आहे.

विशेषतः दिल्लीतूनच या गोष्टींवर लक्ष ठेवले जात आहे. अत्यंत बारकाईने याबाबत सूक्ष्म नियोजन केले जात असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानेही नाव न सांगण्याच्या अटीवर याला दुजोरा दिला. अर्थात ही नेहमीचीच प्रक्रिया आहे, हे विरोधक सर्वपक्षीय आहेत, मात्र त्यांना स्थानिक स्तरावर खूप त्रास सहन करावा लागतो, त्यांना भाजप ताकद देणार आहे, मात्र त्यासाठी त्यांना भाजपशी जुळवून घ्यावे लागणार आहे असेही या नेत्याने सांगितले.

दरम्यान भाजपने खरोखरच ताकद पुरवली तर येणाऱ्या काळात जेव्हा साखर कारखान्यांच्या निवडणूका होतील तेव्हा निवडणूकीचा माहौल काही वेगळाच असेल आणि गावागावात पूर्वी पडलेले दोन गट एकमेकांसमोर भिडतील आणि त्याला भाजपची अतिरिक्त ताकद मिळेल असे मानायलाही हरकत नाही..!

tdadmin

View Comments

  • सहकार एक व्यवसाय करार असु शकतो, समाजाच्या उन्नतीसाठी तयार केलेले व्यवसाय/कारखाने संचालक/चेअरमन मालक समजतात हेच चुक आहे,समाज अर्थीक स्थिती सुधारणे व व्यवसायाला बळ देणे हाच एक सहकाराचा उद्देश आहे,सहकाराचा वापर राजकारण यासाठी केला जात असेल व जात , धर्म , राजकिय पक्ष या मध्ये तेढ निर्माण होऊन राष्ट्रीय ऐक्य धोक्यात येत असेल तर सहकार कायदा ठेवायचा कि नाही हा प्रश्न आहे?? सहकार एक राष्ट्र प्रगतीचे व समाज विकासाचे साधन आहे परंतू सहकार चालवणारे च श्रीमंत होऊन कष्टकरी शेतकरी यांचे शोषण तर होत नाही ना?कायदा समीक्षा आवश्यक, ?

Recent Posts

जागा उपलब्ध करा; दौंडला विद्या प्रतिष्ठान सारखी चांगली शिक्षण संस्था उभी करतो! माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे दौंडकरांना आश्वासन!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंडमध्ये चांगल्या दर्जाची शिक्षण संस्था नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना तालुक्याबाहेर शिक्षणासाठी जावे…

2 days ago