महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
फळांचा राजा असलेला आंब्याचा हंगाम म्हटलं की, सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते.. नव्हे आपण फेब्रुवारी सुरू झाला की, कधी एकदा आंब्याचा हंगाम सुरू होतोय अशा प्रतिक्षेत असतो.. पण आता या आंब्याच्या जोडीला ज्यांना मधुमेह आहे, अथवा होण्याची शक्यता आहे अशांसाठी खुशखबर घेऊन आलाय देशातीलच एक शेतकरी…!
होय, ही काही अमेरिका किंवा एखाद्या परदेशातील विद्यापीठाच्या संशोधनाची शुभवार्ता नाही.. बिहारमधील मुझ्झपरफूर शहरातील रामकिशोर सिंह या शेतकऱ्याने अमेरिकन ब्युटी हा शुगर फ्री आंबा त्याच्या बागेत पिकवला आहे..
हा आंबा दिसायला नेहमीच्या आंब्यापेक्षा थोडा वेगळा आहे.. त्याचे वजन अगदी ४०० ते ५०० ग्रॅमपर्यंत वाढते. आणि जेव्हा आपल्याकडील हापूस संपतो, म्हणजे जून जुलैमध्ये हा आंबा पिकण्यास सुरवात होतो. त्याला परिपक्वतेच्या कालावधीपर्यंत जाण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी लागतो.
या आंब्याचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे तो त्याच्या कालावधीत तब्बल १६ वेळा रंग बदलत असल्याचे या शेतकऱ्याचे म्हणणे आहे. पूर्ण पिकल्यावर तो लाल होतो. मुझ्झफूरपूर हे लिचीसाठी देशात प्रसिध्द आहे. मात्र सध्या साखर असलेल्यांसाठी हा आंबा येथे प्रसिध्द झाला आहे.