इंदापूर : महान्यूज लाईव्ह
गेला काही महिन्यांपासून इंदापूर तालुक्यात अवैध गुटख्याच्या वाहतूक आणि विक्रीचे प्रमाण काही केल्या कमी होत नाही. काल रात्री सरडेवाडी टोल नाक्याजवळ पोलीस नाकेबंदी करत असताना 68 लाख रुपये किमतीच्या गुटख्यासह पोलिसांनी ट्रक पकडला. एकूण 93 लाख 23 हजार रुपये किमतीचा हा मुद्देमाल इंदापूर पोलिसांनी पकडला आहे
या संदर्भात इंदापूर पोलीस स्टेशनचे ठाण्याचे पोलीस निरीक्षक तयूब मुजावर यांनी माहिती दिली. शनिवारी रात्री इंदापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सरडेवाडी टोलनाक्याजवळ नाकेबंदी करत असताना एक गोपनीय माहिती मिळाली. यामध्ये कर्नाटक राज्यातील पासिंग केलेला ट्रक हा सोलापूर कडून पुण्याकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या ट्रकमध्ये गुटखा असल्याची माहिती देखील खबऱ्यांनी दिली होती.
त्यानुसार ट्रक येथे आल्यानंतर पोलिसांनी ट्रक थांबवला हा ट्रक क्रमांक (के ए 28 बी 9 8 31) थांबवून त्यामध्ये तपासणी केली असता, गुटख्याच्या 178 पोत्यांची थापी त्या ठिकाणी आढळून आली. पोलिसांनी लागलीच ट्रक बाजूला घेऊन ताब्यात घेतला. हा संपूर्ण गुटखा 68 लाख 23 हजार 920 रुपयांचा असल्याची पोलिसांनी माहिती दिली. तर ज्या ट्रकमधून हा गुटखा वाहतूक केला जात होता, तो 25 लाख रुपये किमतीचा ट्रक असा मिळून 93 लाख 23 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी ट्रक मालकासह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.