विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
आमचे अजितदादांशी खूप चांगले संबंध असे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याचीच रि ओढत अजितदादांशी संबंध चांगले असल्याचा निर्वाळा दिला, मात्र राज्यातील सत्ता गेल्यानंतर चालू विकास कामांचे काय होणार? असा जो प्रश्न पडला होता आणि खुद्द अजितदादा व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील कुठल्याही कामाला स्थगिती मिळणार नाही असे सांगितले होते, त्याला मात्र तडा गेला आहे. कारण शिंदे सरकारने बारामती नगरपरिषदेच्या 245 कोटींच्या कामाला स्थगिती दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर विकास विभागाच्या म्हणजे ते पूर्वी ज्या खात्याचे मंत्री होते, त्याच खात्यातील 941 कोटींच्या विकास कामांच्या मंजुरीला स्थगिती दिली आहे. मार्च ते जून 2022 यादरम्यान मंजूर असलेल्या कामांना ही स्थगिती असून त्या 941 कोटी मध्ये एकट्या बारामती नगर परिषदेला 245 कोटींचे वितरण झाले होते.
आता ही सर्व कामे स्थगित करण्यात आली आहेत. अर्थात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सुचवलेल्या सर्वच कामांना यामध्ये स्थगिती दिली आहे, तर शिवसेनेच्या आमदारांना मात्र यामध्ये स्थगिती देण्यात आलेली नाही. जे राज्यामध्ये मंत्री होते त्यांच्या विरोधातील आमदार, माजी आमदार यांनी तक्रारी केल्यास शिंदे सरकार तातडीने निर्णय घेत असून, आमदारांनी व मंत्र्यांनी पूर्वी केलेल्या मंजूर कामांना लगेचच स्थगिती देत असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत हा शिंदे सरकारचा जाणीवपूर्वक महाविकास आघाडीतील पूर्वीच्या मंत्र्यांना धक्का असल्याचे सांगितले जात आहे.
राजकारण आणखी काय…