नानाची टांग
(स्थळ – हुबालवाडी ग्रामपंचायत, नव्यानंच सरपंच संजू व उपसरपंच राजू दोघेच सारा कारभार पाहताहेत.. सदस्यांना अद्याप गावाने कारभारात भाग घेण्यास संमती दिलेली नाही. म्हणून त्यांनी आज ग्रामसभा बोलावली आहे.. त्याचा आंखो देखा हाल… म्हणजे हालहाल…)
संजू – राजूभाऊ मी बोलू का? राजू – (नाकाला हात लावून हळू आवाजात) हा..बोल बोल… पण मी काल रात्री सांगितलंय तेवढंच बोलायचं.. जास्तीचं बोलला तर याद राख.. माईकच ओढीन..
संजू – (कोणालाच काही कळलं नसावं असं समजून हसत..) तर आज भरवलेल्या या ग्रामसभेत अध्यक्ष या नात्याने मी ग्रामसभा सुरू करण्याची सूचना करतो..
बाळासाहेब – सरपंच, तुमची निवड झाली, त्याबद्दल अभिनंदन.. पण तुमच्या आधीचे सरपंच महादूभाऊ यांनी हुबालवाडीला आदर्शनगर नाव देण्याचं जाहीर केलं आहे, त्याबद्दल तुमचं मत काय?
राजू (मध्येच) – हो.. हो… मागच्यांनी काय केलं त्याचं आपल्याला काही देणंघेणं नाही.. त्यांचा निर्णय रद्द.. म्हणजे रद्दच..! आदर्शनगर नाही ना काही नाही.. बाळासाहेब – अहो पण, एवढा चांगला निर्णय आहे, गावाचीच मागणी होती.. म्हणून..!
राजू – (संजू बोलणार होता, पण मध्येच माईक ओढून घेत) असंल गावाचं म्हणणं… पण कायदेशीर व वैध अधिकार आमच्याच बॉडीला आहे.. मागचा निर्णय रद्द म्हणजे रद्द… लगेच ठराव करा ( ग्रामसेवक उठून हा ठराव मंजूर का? विचारतात… कोणीच काही बोलत नाही..! मग ओशाळल्या नजरेनंच हा ठराव बहुमताने मंजूर झाल्याचे राजू जाहीर करतो..)
राजू – आता मी नवा ठराव मांडतो.. सरपंच संजू यांची त्याला संमती आहेच.. हो ना? ( संजू काहीच माहिती नसतानाही होकारार्थी मान डोलावतो..) तर आम्ही नवा ठराव मांडतो आहोत आणि अर्थातच तो मंजूरच झाला आहे असे समजायला काहीच हरकत नाही.. आपल्या हुबालवाडी गावाचं नाव आदर्शनगर झालेलं आहे… आता यापुढं आपल्या गावाला आदर्शनगर म्हणायचं.. जोपर्यंत गॅझेटमध्ये नाव येत नाही, तोवर थांबायचे कशाला?
बाळासाहेब – आयला… मग आधी ठराव केला होता, तो काय चुकीचा होता? (संजू उत्तर देणार तेवढ्यात, राजूने त्याचा माईक पुन्हा खेचला..)
राजू – हे बघा बाळासाहेब, तो निर्णय त्या बॉडीचा अधिकार नव्हता.. आम्ही कायदेशीर.. आम्ही वैध… तेव्हा तो निर्णय आमचाच… आणि हो हा अतिशय ग्रेट निर्णय आहे.. यापूर्वी कोणालाही तो जमला नव्हता.. केवळ आम्हीच या गावाचे नाव आदर्शनगर केलेले आहे.. वाजवा टाळ्या..!
प्रसंग दुसरा…
(एका घरासमोर एक बाई येते.. सुया घे.. बिबा घे… आरसा घे.. गं माई अशी हाळी देत येते..)
सूनबाई – आम्हाला काही घ्यायचं नाही.. तुझ्याकडं तेवढं क्वालिटीचं नसतंय.. बाई – असं वं कसं बाईसाब… माझ्याकडनं तर येवढ्या लोकाईंनी घेतलंय की, कुनाचीच कायबी कंप्लेट नाय बगा.. तुमीच काहून एवढं कावतांय?
सूनबाई – नको म्हणतोय ना आम्ही? नाही घ्यायचं आम्हाला काही.. जे कोणी चांगलं म्हणतेत त्याला विक.. बाई – असं काही करू नका ओ.. दिसभर फिरतेय.. कुनीच अजून काही घेतलं नायी… तुमी नाय म्हनू नका ना..!
(तेवढ्यात सासूबाई घराबाहेर येते.. सूनबाईच्या आदेशामुळे रागावलेली सासू..)
सासूबाई – काय गं टवळी.. मी अजून काही मेलेली नाही.. मी घरात असतानाच तु कोण सांगणार काय खऱेदी करायचं आणि काय नाही?… तुला काय घेणंदेणं आहे गं..?
(सासूने सूनेला झापल्याचं पाहून बाईच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात.. आता काहीही करून सासूबाई काहीतरी खरेदी करणार याची खात्री तिला आलेली असते.. ती सासूकडे आशेने पाहते..)
सासूबाई – काय गं काय आहे तुझ्याकडं.. बाई – सुया, बिबं. आरसा, हे बघा लहान पोरास्नी खेळणी.. फुगं.. केसाच्या किल्पा, पिना, बांगड्यासुदीक हायती..
सासूबाई – तुझ्याकडं काहीच क्वालिटीचं नाही.. त्यामुळं आम्हाला काहीच नको.. बाई – आता तर तुम्ही सूनबाईला झापलं की..
सासूबाई – हो.. बरोबरय.. या घरात माझा अधिकार चालतो.. ती नवीन.. त्याच्यामुळं कोणाला काही निर्णय सांगायचा, तो माझा अधिकार.. माझ्या घरात मीच सरकार.. काय? तिच्या अधिकाराला काय महत्व नाही.. त्यामुळं माझ्या अधिकारात मी हे सांगते की..
बाई – राहू द्या बया.. तुमचं त्या राज्यातल्या मंत्रीमंडळासारखं झालंया.. आधीच्यानं निर्णय घेतला की, नव्यानं आलेल्यास्नी त्यो काय पटत नाई.. मग ते रद्द करतंय.. आन दुसऱ्याच दिशी दोघांचीच कॅबिनेट का फिबीनेट घेतया… आन पुन्हा कॅन्सल केलेला ईषय पुन्हा नव्यानं मंजूर करतंय… तसंच झालं की… खरंय वं खरंय.. घरोघरी मातीच्या चुली.. चिखलाच्या टिरी…!